परिपूर्णतेचे मूर्तीमंत स्वरूप असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात सेवा करतांना श्री. राहुल कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले म्हणजे परिपूर्णता आणि प्रीती यांचे मूर्तीमंत स्वरूपच ! सर्वज्ञ असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी स्पर्श केला नाही, असा कोणताही विषय नाही. अवतारत्वाला मानवी देहाच्या मर्यादांचे बंधन असूनही जवळजवळ सर्वच क्षेत्रांत, म्हणजे बांधकामापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सर्वज्ञतेचा ठसा उमटवला आहे. अध्यात्माच्या क्षेत्रातील त्यांचे स्थान तर सर्वाेच्च आणि अद्वितीयच आहे. स्वतःसमवेतच साधकांना घडवणारी ही विभूती कलियुगात अनमोलच ! साधकांना अपूर्णतेची जाण करून देऊन आणि त्यांना पूर्णत्वाचा ध्यास लावून प्रत्येक कृती परिपूर्ण करायला प्रोत्साहित करणारे अन् वेळप्रसंगी स्वतःच्या कृतीतून शिकवणारे परात्पर गुरुदेव यांच्याप्रती किती कृतज्ञतापुष्पे अर्पण करावीत ! स्वतः सतत शिकण्याच्या भूमिकेत राहून साधकांना साधनेचे बारकावे शिकवून परिपूर्णतेकडे नेणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या संदर्भात ‘कृतज्ञता’ हा शब्दही थिटाच पडेल. साधकांचे ईश्वरप्राप्तीचे व्यष्टी ध्येय आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेचे समष्टी ध्येय ही किती परस्परपूरक ध्येये आहेत, हेही इथे लक्षात येते.

त्यांच्या सत्संगात राहून त्यांच्याकडून अनुभव अन् अनुभूती यांचे ज्ञानमोती वेचणारे श्री. राहुल कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

१. वर्ष २००३ – मिरज आश्रमाच्या बांधकामासंदर्भात सूत्रे

१ अ. मायेतील प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने पहाणे

श्री. राहुल कुलकर्णी

‘वर्ष २००३ मध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मिरज आश्रमात प.पू. डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीच्या बाजूच्या खोलीचे दार पावसामुळे फुगले होते. त्या वेळी देखभाल-दुरुस्ती विभागांमध्ये सुतारकाम करणारे साधक उपलब्ध नसल्याने मी प्रथम ‘दार उघडल्यावर ते कुठपर्यंत येऊन थांबते ?’, ते पहाण्यासाठी गेलो. त्यानंतर मी दार जेवढे फुगले होते, तेवढ्याच दाराच्या भागाला रंधा मारण्यास आरंभ केला. त्या वेळी प.पू. डॉक्टर बाहेर आले आणि मला म्हणाले, ‘‘सांभाळून कर. दार आवश्यकतेपेक्षा अधिक कापले जायला नको.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘या लाकडातील शिरा (रेघा) जशा एकत्र आहेत, तसेच आपले सर्व साधक एकत्र आले आहेत.’’

१ आ. प्रत्येक कृती करण्यापूर्वी त्यामागील कारण जाणून घेऊन ‘परिपूर्ण कृती कशी करायला हवी ?’, ते शिकवणे

मिरज आश्रमात एका ठिकाणी कपाटाला पडदा लावण्यासाठी मी छताला (‘स्लॅब’ला) छिद्रे पाडत होतो. ती छिद्रे कपाटापासून एक फूट पुढे होती. त्या वेळी प.पू. डॉक्टर तेथे आले आणि आमच्यात पुढील संभाषण झाले.

प.पू. डॉक्टर : हे कशासाठी करत आहेस ? पडदे लावल्याने कपाट चांगले दिसावे, यासाठी लावत आहेस कि कपाटात धूळ जाऊ नये; म्हणून लावत आहेस ?

साधक : कपाट चांगले दिसावे; म्हणून लावत आहे.

प.पू. डॉक्टर : आपली एकूण ५ फूट जागा वाया गेली. पडदे कपाटाला धूळ लागू नये; म्हणूनच लावले जातात.

नंतर त्यांनी ही चूक आश्रम सेवकांनाही सांगितली आणि प्रत्येक बुधवारी आश्रमात घेतल्या जाणार्‍या स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या सत्संगामध्येही सांगितली.

१ इ. सेवा करतांना शक्ती आणि वेळ वाचण्यासाठी उपलब्ध यंत्राचा वापर करण्यास सांगणे

२००३ या वर्षी मिरज आश्रमामध्ये सुतारकामाची सेवा चालू होती. ही सेवा करणारे साधक करवतीने लाकूड (प्लाय) कापत असलेले पाहून प.पू. डॉक्टरांनी ते ‘लाकूड कापण्याच्या यंत्रा’ने (‘कटर मशीन’ने) कापण्यास सांगितले. ‘‘ते यंत्र आपल्याकडे आहे ना ?’’, असे त्यांनी विचारून घेतले आणि ‘‘आहे, तर ते वापरूया’’, असे सांगितले.

त्याच पद्धतीने रामनाथी येथे आश्रमाच्या बांधकामाच्या वेळी खिडक्या बसवतांना लाकूड कापण्यासाठी एखादा सुतार किंवा साधक करवतीचा वापर करतांना दिसल्यास प.पू. डॉक्टर ते यंत्राने कापण्यास सांगायचे. ‘यंत्राने लाकूड कापल्यावर आपली शक्ती आणि वेळ वाचतो’, असे ते आम्हाला सांगायचे.

१ ई. किरकोळ दुरुस्तीसाठी बाहेरून कामगार बोलवण्यापेक्षा साधकांना ती शिकण्यास सांगणे

मिरज आश्रमात एका किरकोळ दुरुस्तीसाठी बाहेरून कामगार बोलावला होता. त्याविषयी बोलतांना प.पू. डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘ती दुरुस्ती आपणच शिकून घ्यायला पाहिजे. त्या कामगारासमवेत कुणीतरी राहून ते शिकायला पाहिजे.’’

१ उ. प.पू. डॉक्टरांनी साधक करत असलेले अवघड काम स्वतः करून पहाणे

मिरज आश्रमात पाण्याच्या टाकीवर चढता येण्यासाठी एका लाकडी खांबाला लहान लाकडी ठोकळे ठोकलेले होते. ‘टाकीमधील पाण्याची पातळी पहाण्यासाठी साधकांना या ठोकळ्यांवरून वर चढावे लागत असे. एकदा या ठोकळ्यांवरून पाण्याची पातळी पहाण्यासाठी श्री. शंकर नरुटे जात असतांना प.पू. डॉक्टरांनी त्याला पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठोकळ्यांवरून वर चढण्यास आरंभ केला. साधक करत असलेले अवघड काम प.पू. डॉक्टर स्वतः करून पहात असत.

१ ए. प.पू. डॉक्टरांनी वस्तूंचा योग्य वापर करण्यास सांगणे

एकदा मी कन्सिल्ड पायपिंग (भिंतीअंतर्गत विद्युत् जोडण्यांसाठी लागणारे पाईप) करण्यासाठी भिंत फोडत होतो. भिंतीच्या विटांचे तुकडे खाली पडल्यानंतर ते गोळा करता यावेत, यासाठी खाली रिकाम्या गोण्या घातल्या होत्या. त्या वेळी प.पू. डॉक्टर तेथे आले. आमच्यात पुढील संवाद झाला.

प.पू. डॉक्टर : चांगली गोणी खाली का अंथरली आहे ?

मी : ती फाटलेली गोणी आहे; परंतु तिची वरची बाजू चांगली आहे.

प.पू. डॉक्टर : तिची वरची बाजू चांगली असल्याने आपण तिचा बसण्यासाठी वापर करू शकतो.

(क्रमश:)

– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२०)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/637721.html