वर्षभरात १० पैकी ६ भारतियांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भ्रमणभाष आणि तत्सम चिनी उत्पादनांच्या खरेदीत मात्र वाढ !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील यांगत्से येथील सीमेवर चीन आणि भारत सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘लोकल सर्कल’ या एका सामाजिक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून गेल्या वर्षभरात १० पैकी ६ लोकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातल्याचे समोर आले आहे.

१. या संस्थेने देशातील ३१९ जिल्ह्यांतून वेगवेगळ्या शहरांमधील ४० सहस्रांहून अधिक लोकांची मते घेतली.

२. यात लोकांना विचारण्यात आले की, गेल्या वर्षभरात चिनी उत्पादनांची खरेदी अल्प होण्यामागील कारण काय आहे ? यावर ५८ टक्के लोकांनी सांगितले की, चीनसमवेत चालू असलेल्या तणावामुळे त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला आहे.

३. सर्वेक्षणात २८ टक्के लोकांनी, ‘मूल्य, गुणवत्ता आणि चांगली ग्राहक सेवा यांमुळे भारतीय उत्पादनांची खरेदी करत आहोत’, असे सांगितले. ११ टक्के लोकांनी म्हटले की, केवळ गुणवत्ता आणि मूल्य पाहून भारतीय उत्पादने घेत आहोत. ८ टक्के लोकांनी अन्य विदेशी उत्पादनांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. तसेच ८ टक्के लोकांनी असेही सांगितले की, त्यांना आवडीची उत्पादने किंवा नामांकित आस्थापनांची उत्पादने ऑनलाईन मिळाली नसल्याने त्यांना चिनी उत्पादने विकत घ्यावी लागत आहेत.

४. ३५ टक्के लोकांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात त्यांनी चिनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने विकत घेतली. तसेच १४ टक्के लोकांनी सणांच्या वेळी चिनी आस्थापनांचे रोषणाईचे दिवे विकत घेतले.

५. ५९ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या भ्रमणभाषमध्ये एकही चिनी अ‍ॅप नाही, तर २९ टक्के लोकांच्या भ्रमणभाषमध्ये १ किंवा त्याहून अधिक अ‍ॅप आहेत, अशी माहिती दिली.

६. सर्वेक्षणानुसार अद्यापही भारतात चिनी भ्रमणभाष किंवा तत्सम उत्पादनांची विक्री अधिक आहे आणि ती वाढत आहे.

संपादकीय भूमिका

  • चिनी भ्रमणभाष आणि तत्सम उत्पादने यांना योग्य पर्याय नसल्याने भारतीय अद्यापही ही उत्पादने विकत घेत आहेत, हे लक्षात येते ! भारतात या गोष्टी उत्पादित होण्यासाठी भारत सरकारने उद्योजकांना प्रोत्साहित करणे आवश्यक !