बिहारमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या !

  • मृतदेह खड्ड्यात पुरला !

  • मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस निष्क्रीय राहिल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या बगहा येथे एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नदी किनारी पुरल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी १५ डिसेंबरपासून बेपत्ता होती.

१. १८ डिसेंबर या दिवशी तिचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ तिचा शोध घेत नदीच्या पलीकडे पोचल्यानंतर त्यांना नदीकिनारी भूमी नुकतीच खोदण्यात आल्याचे दिसून आले. त्यावर बोरीचे काटेही टाकण्यात आले होते.

२. ग्रामस्थांना संशय आल्यानंतर त्यांनी ती जागा खोदली असता त्यात मुलीचा मृतदेह आढळला. खड्ड्याजवळच मुलीचा शालेय गणवेशही पडला होता. ऊसाच्या शेतात तिची चप्पल आढळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्वेषण चालू केले.

३. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. मुलगी बेपत्ता झाल्यावर पीडित कुटुंबियांनी गावातीलच एका तरुणाविषयी संशय व्यक्त केला होता; पण पोलिसांनी वेळीच त्याचा शोध घेतला नाही. परिणामी मुलीचा थेट मृतदेहच आढळला, असा आरोप गावकर्‍यांकडून केला जात आहे.

४. पोलिसांच्या माहितीनुसार, ऊसाच्या शेतात प्रथम तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर नदीच्या शेजारी खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरून टाकण्यात आला.

संपादकीय भूमिका 

बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज निर्माण झाले आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! विषारी दारू प्रकरणही पोलीस निष्क्रीय राहिल्यानेच घडले आहे. हे पहाता बिहारमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे !