(म्हणे) ‘आम्ही शांत बसण्यासाठी अणूबाँब बनवलेला नाही !’

पाकिस्तानच्या मंत्री शाजिया मर्री यांची भारताला धमकी !

पाकिस्तानच्या मंत्री शाजिया मर्री

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचे ठाऊक आहे. पाकिस्तान एक थप्पड खाऊन दुसरा गाल समोर करणारा देश नाही. भारताकडून काही कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिले जाईल. पाकिस्तानकडे अणुबाँब आहे, हे भारताने विसरू नये. आमची आण्विक शक्ती गप्प बसण्यासाठी नाही, अशी धमकी पाकिस्तानच्या मंत्री शाजिया मर्री यांनी भारताला दिली. ‘मी अनेक मंचांवर मोदी सरकारने पाठवलेल्या प्रतिनिधींशी लढले आहे’, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गुजरातचा कसाई’ आणि ‘रा.स्व. संघाचा पंतप्रधान’ असे म्हटले होते. त्यावरून भुट्टो यांना भारतात विरोध होत आहे. या विरोधावरून बिलावल भुट्टो यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाजिया बोलत होत्या.

शाजिया पुढे म्हणाल्या की, भारतीय मंत्र्याने संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘पाकिस्तान हे आतंकवादाचे केंद्र आहे’, असे म्हटले. हा त्यांचा प्रचार आहे. (हा प्रचार नाही, तर वस्तूस्थिती आहे, हे जगालाही ठाऊक आहे ! – संपादक) हे केवळ आजचे नाही. आम्ही विरोधात असतांनाही लढतो. आपल्यालाही आपल्या देशाचे रक्षण करायचे असून देशाविरुद्धच्या चुकीच्या प्रचाराचे षड्यंत्र उघड करायचे आहे. तुम्ही पाकिस्तानवर वारंवार आरोप करत राहिल्यास पाकिस्तान शांतपणे ऐकून घेऊ शकत नाही. (पाकिस्तान भारताकडून ४ वेळा युद्धात पराभूत झाला आहे. त्याची फाळणीही झाली आहे. त्यामुळे पाक तोंडाच्या वाफा दवडण्याच्या पलीकडे काही करण्याच्या पात्रतेचा नाही, हे जगालाही ठाऊक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आर्थिक दिवाळखोरी होण्याच्या स्थितीत असणार्‍या पाकने अशा प्रकारच्या धमक्या देणे, म्हणजे उसने अवसान आणण्यासारखे आहे ! पाककडे असलेल्या अणूबाँब खरेच क्षमतेचे आहेत का ? हाच प्रश्‍न आहे. पाकच्या एका माजी मंत्र्याला ‘अणूबाँब कसा असतो ?’ हेही ठाऊक नव्हते. असे लोक भारताला धमकी देतात, हे हास्यास्पदच होय !