विषारी दारू पिऊन मरणार्‍यांना एक रुपयाही हानीभरपाई देणार नाही ! – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारू पिऊन आतापर्यंत ५९ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता सिवान येथे ५ जणांचा आणि बेगुसराय येथे एका व्यक्तीचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बिहारच्या विधानसभेत सलग तिसर्‍या दिवशी गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी सरकार विसर्जित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये हानीभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, ‘त्यांचा मृत्यू विषारी दारू पिऊन झाला आहे, मग सरकारने त्यांना हानीभरपाई का द्यावी ?  सरकार एक पैसाही देणार नाही’, असे स्पष्टपणे सांगितले.

पोलिसांनी जप्त केलेल्या दारूपासून विषारी दारूची निर्मिती

छपरा विषारू दारूच्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवलेल्या दारूपासून ही विषारी दारू बनवल्याचा संशय आहे. पोलिसांनीच ही दारू त्यांना पुरवल्याचा दावा केला जात आहे. याचा पुरावा म्हणून गावकर्‍यांनी व्हिडिओ सिद्ध करून उत्पादन शुल्क विभागाचे मुख्य सचिव के.के. पाठक यांना पाठवला.

तक्रारीनंतर मुख्य सचिवांनी कारवाई केली आणि सहआयुक्त कृष्णा पासवान आणि उपसचिव निरंजन कुमार यांना चौकशीसाठी पाठवले. त्यांनी पाहिले, तर जप्त केलेल्या दारूच्या पिंपांतून दारू गायब होती. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. दुसरीकडे विषारी दारूच्या प्रकरणी आतापर्यंत १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

नितीश कुमार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याचसमवेत राज्यात गेली ६ वर्षे दारूबंदी असतांना राज्यात सर्रास दारू कशी मिळत आहे ?, याविषयी ते अपयशी का ठरले ? आणि ठरत आहेत ? तसेच यापुढे हे थांबवण्यासाठी ते काय करणार आहेत ?, हेही त्यांनी सांगायला हवे !