भारताने चीनला ‘बालाकोट’प्रमाणे धडा शिकवावा ! – अजमेर दर्ग्याचे दिवाण झैनुल अबदिन अली खान

अजमेर (राजस्थान) – चीन प्रतिदिन भारतीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतोे. भारतीय सैन्याशी चिनी सैनिकांशी संघर्ष झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. आम्हाला अभिमान आहे की, आमच्या सैनिकांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. प्रतिदिन अशा कुरापती होत असतील, तर भारताने चीनला ‘बालाकोट’प्रमाणे एखादा धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया अजमेर येथील मोईनुद्दीन दर्ग्याचे प्रमुख दिवाण झैनुल अबदिन अली खान यांनी व्यक्त केली आहे. तवांगच्या येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्ष २०१९ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यात अनेक आतंकवादी ठार झाले होते.

(वर्ष २०१९ मध्ये पाकमधील बालाकोट येथील आतंकवादी तळांवर भारतीय सैन्याने  हवाई आक्रमण केले होते.)

खान पुढे म्हणाले की, भारत हा कायमच शेजराच्या देशांसमवेत शांतता आणि चांगले संबंध रहावे, यासाठी प्रयत्नशील असतो; मात्र त्याचा अर्थ ‘भारत दुर्बल आहे’, असा घेतला जाऊ नये.

चीन असो किंवा इतर कोणताही देश, सीमांचे संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. बालाकोट येथे केलेेले हवाई आक्रमण, हे त्याचे उदाहरण होय. चीनने त्याच्या कुरापती थांबवल्या पाहिजे. तसे होणार नसेल, तर हा ‘नवीन’ भारत आहे, हे त्याने लक्षात घेतले पाहिजे, अशी चेतावणीही त्यांनी दिली.