‘ध्यानमंदिरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा काही अंतरावर आपोआप खाली भूमीवर पडणे’ या आध्यात्मिक घटनेचे केलेले संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आध्यात्मिक स्वरूपाच्या चांगल्या-वाईट घटना घडत असतात. या आध्यात्मिक घटनांचे संशोधन केल्याने त्यामागील कार्यकारणभाव लक्षात येतो, तसेच अध्यात्मातील विविध पैलू उलगडतात. अशाच एका आध्यात्मिक घटनेचे केलेले संशोधन पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. ध्यानमंदिरातील पटलावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा काही अंतरावर आपोआप खाली भूमीवर पडणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सुंदर ध्यानमंदिर आहे. ध्यानमंदिरात देवतांच्या प्रतिमा अन् मूर्ती, सनातनच्या गुरुपरंपरेतील (टीप) संतांच्या प्रतिमा, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. आश्रमातील साधक ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय करतात.

७.४.२०२२ या दिवशी नेहमीप्रमाणे साधक नामजपादी उपायांसाठी ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा स्थुलातील काही कारण नसतांना ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा काही अंतरावर आपोआप खाली भूमीवर पडली. हे पाहून साधक अवाक् झाले.

टीप – सनातनची गुरुपरंपरा : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने लावलेल्या सनातन संस्थारूपी इवल्याशा रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांच्यापासून चालू झालेली ही गुरुपरंपरा पुढे विस्तारत गेली. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद महाराज, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज अन् प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले ही सनातनची गुरुपरंपरा आहे.

२. चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

सौ. मधुरा धनंजय कर्वे

७.४.२०२२ या दिवशी घडलेल्या घटनेचे संशोधन करण्यासाठी ध्यानमंदिराची काही छायाचित्रे काढण्यात आली. ही छायाचित्रे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.

२ अ. ध्यानमंदिराच्या छायाचित्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते, तसेच या छायाचित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जाही आढळून आली.

२ आ. ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेत पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेच्या पुढील अन् मागील बाजू यांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. तुलनेसाठी म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांच्या २८.१२.२०२१ या दिवशीच्या छायाचित्रांची निरीक्षणेही पुढे दिली आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या छायाचित्रांत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. ध्यानमंदिराच्या छायाचित्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : आश्रमातील ध्यानमंदिरातील चैतन्यामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने असतात. ७.४.२०२२ या दिवशी ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा आपोआप खाली पडल्यानंतर मात्र निराळाच अनुभव आला. तेव्हा ध्यानमंदिराच्या काढलेल्या छायाचित्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याचे कारण हे की, सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्तींनी ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेवर जोरदार आक्रमण केल्याने ती आपोआप खाली पडली. त्या वेळी ध्यानमंदिर जणू सूक्ष्मातील युद्धाची ‘रणभूमी’ बनली होती. तेथील वातावरण त्रासदायक शक्तीने भारित झाले होते. ध्यानमंदिरातील सात्त्विकता आणि वाईट शक्तींनी सोडलेली त्रासदायक शक्ती यांमध्ये सूक्ष्मयुद्ध झाले. याचे प्रतिबिंब ध्यानमंदिरातील छायाचित्रांमध्ये उमटून आले.

३ आ. ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेत पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले जिवंत रहाणे अत्यंत आवश्यक आहे’, असे अध्यात्मातील जाणकारांनी सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे या सूक्ष्मातील युद्धाचे केंद्रबिंदू आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभलेले महान कार्य पूर्णत्वास जाऊ नये, यासाठी मोठ्या वाईट शक्ती त्यांच्यावर जीवघेणे आक्रमण करतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्यात विघ्ने आणण्यासाठी त्या विविध क्लृप्त्या वापरून सतत प्रयत्नशील असतात. ७.४.२०२२ या दिवशी घडलेली घटना म्हणजे या सूक्ष्मयुद्धाचा एक भाग आहे.

ध्यानमंदिरात ठेवलेल्या गुरुपरंपरेतील प्रतिमांपैकी परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रतिमेवर आक्रमण करणे, म्हणजे ‘साधकांना चैतन्यापासून वंचित करणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे, साधकांची गुरूंवरील श्रद्धा डळमळीत करणे, यांसाठी वाईट शक्तींचे हे नियोजन आहे’, असे जाणवले. (यापूर्वी एकदा गुरुपरंपरेतील प्रतिमांपैकी प.पू. रामानंद महाराज यांचे छायाचित्र स्थुलातील काही कारण नसतांना खाली पडले होते.)

साधारण २८.१२.२०२१ या दिवशी म्हणजे ही घटना घडण्याआधी अनुमाने ३ मासांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात नकारात्मक ऊर्जा काहीच नसून १२९३.८० मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात चैतन्य आहे, हे लक्षात येते. परात्पर गुरु डॉक्टरांतील चैतन्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ७.४.२०२२ या दिवशी घडलेल्या घटनेनंतर ध्यानमंदिरातील त्यांच्या प्रतिमेमध्ये १३५.३० मीटर नकारात्मक ऊर्जा आढळून आली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रतिमेवर सूक्ष्मातील वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणाचा हा तात्कालिक परिणाम आहे. थोडक्यात ‘परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्ती सूक्ष्मातून कशा प्रकारे आक्रमण करतात आणि त्याची तीव्रता किती अधिक आहे’, हे या संशोधनातून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१०.२०२२)

ई-मेल : [email protected] 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक