मुसलमान मुलांनी मदरशांत शिकून इमाम होण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आवाहन

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – स्थलांतरित मुसलमानांच्या मुलांनी मदरशांमध्ये शिकून इमाम बनण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. आसामी हिंदु कुटुंबातील डॉक्टर असतील, तर मुसलमान कुटुंबातीलही डॉक्टर असावेत. अनेक आमदार असा सल्ला देत नाहीत; कारण त्यांना ‘पोमुवा’ मुसलमानांची मते हवी आहेत, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे केले. ते मोरीगाव येथील जाहीर सभेत बोलत होते. बांगलादेशातील बंगाली भाषिक मुसलमानांना आसाममध्ये ‘पोमुवा मुसलमान’ म्हणतात.

आसाममधील लोकसभेचे खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी काही दिवसांपूर्वी हिंदूंनी मुसलमानांप्रमाणे अधिक मुलांना जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. त्यावर मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, भारतात रहाणार्‍या पुरुषाला पहिल्या पत्नीला घटस्फोट देईपर्यंत दुसर्‍या महिलेशी लग्न करण्याचा अधिकार नाही. जर मुसलमान मुलींना हिजाब (मुलसामन महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालण्यास सांगितले जाते, तर मुलेही असे का करत नाहीत ? मुसलमान मुली शाळेत शिकू शकत नाहीत; पण मुसलमान पुरुष २-३ महिलांशी लग्न करू शकतात. याला आमचा विरोध आहे. आम्हाला ही व्यवस्था पालटायची आहे. मुसलमान महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. महिला २०-२५ मुलांना जन्म देऊ शकतात; परंतु मुलांचे अन्न, कपडे, शिक्षण आणि इतर सर्व खर्च खासदार अजमल यांनी करावा. मग आम्हाला कसलीही अडचण नाही. आपण जेवढ्या मुलांना खायला देऊ शकतो, तेवढीच मुले जन्माला घालावीत आणि त्यांना चांगली व्यक्ती बनवावे.