उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सान्वी अमेय लोटलीकर ही या पिढीतील एक आहे !
५.१२.२०२२ (मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी) या दिवशी कु. सान्वी अमेय लोटलीकर हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. सान्वी अमेय लोटलीकर हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. मनमिळाऊ स्वभाव
‘कु. सान्वी जेथे जाईल, तेथे सर्वांना आपलेसे करून घेते. तिच्या बोलक्या आणि मनमिळाऊ स्वभावामुळे सगळ्यांना ती हवीहवीशी वाटते.
२. कलेची आवड असणे
२ अ. इतरांना शुभेच्छापत्रे अथवा भेटवस्तू बनवून देणे : सान्वीला इतरांना शुभेच्छापत्रे बनवून देणे पुष्कळ आवडते. कुणाचा वाढदिवस असेल, कुणी घरी येणार असेल किंवा कुणी लांबच्या प्रवासासाठी जाणार असेल, तर सान्वी त्यांना शुभेच्छापत्रे किंवा आपल्या हाताने एखादी छोटीशी वस्तू बनवून भेट देते.
२ आ. सात्त्विक आणि आनंददायी चित्रे काढणे : सान्वीला चित्रे काढण्यास पुष्कळ आवडते. तिची बहुतेक सर्व चित्रे आनंददायी आणि सात्त्विक असतात. एके दिवशी आम्हाला परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) सत्संगाचे महत् भाग्य प्राप्त झाले. गुरुदेव बोलत असतांना सान्वीने त्यांचे रेखाचित्र काढले. गुरुदेवांनाही ते फार आवडले. त्यासाठी त्यांनी तिला खाऊ दिला. अशाच पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशीही तिने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये बघून परम पूज्य गुरुमाऊलींचे पुष्कळ सुंदर असे चित्र काढले होते. ते चित्र पाहून आम्हा सर्वांची भावजागृती झाली. ‘तिने काढलेल्या सर्वच चित्रांतून आनंदाचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवते.
३. गुरुकृपेने सान्वीला विविध अनुभूती येणे
अ. ‘कुलदेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर कुलदेवाची मूर्ती आपल्याशी बोलत आहे. आपण ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी ती आपल्याकडे मान वळवून बघत आहे’, अशी अनुभूती सान्वीला पुष्कळ वेळा येते.
आ. परम पूज्य गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहूनही ती असेच करते. एके दिवशी मी देवपूजा करत असतांना ती वाकून पहात होती. तेव्हा मी तिला याविषयी विचारले. ती म्हणाली, ‘‘छायाचित्रामधील आबा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडे बघत आहेत. खोलीतून दुसरीकडे जात असतांना माझ्याकडे मान वळवून बघतात.’’
‘हे भगवंता, सान्वीसारख्या दैवी बालकाचे पालक होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. ‘अशा दैवी बालकांचे पालकत्व निभावण्याची शक्ती आणि बुद्धी तुम्ही आम्हाला द्या. तुमची कृपादृष्टी सदैव अशीच आमच्यावर राहू द्या’, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. अमेय लोटलीकर आणि सौ. आर्या लोटलीकर (सान्वीचे वडील आणि आई), फोंडा, गोवा. (१६.११.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |