मनुष्याच्या मेंदूत ‘चिप’ बनवून तो संगणकाशी जोडणार !

  • इलॉन मस्क यांच्या आस्थापनाने बनवली चिप ! 

  • मस्क स्वतःही याचा वापर करणार !

(चिप म्हणजे एक प्रकारचे आधुनिक यंत्र)

वॉशिंग्टन (अमेरिका) – प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या आस्थापनाने एक आधुनिक यंत्र (चिप) बनवले आहे. ही ‘चिप’ म्हणजे मेंदूला संगणकाशी जोडण्याचा प्रकार आहे. ही चिप माकडाच्या डोक्यात शस्त्रकर्म करून बसवण्यात आली. त्याद्वारे हा माकड मनुष्याप्रमाणे कृती करत असल्याचे प्रयोगातून समोर आले आहे. यावरून मस्क यांनी दावा केला आहे की, अशा प्रकारच्या ‘चिप’चा वापर पुढील ६ मासांमध्ये मनुष्यावरही करण्यात येणार आहे. याचा लाभ अर्धांगवायू झालेले रुग्ण आणि अंध व्यक्ती यांना होणार आहे.

१. मस्क म्हणाले की, आमचे यंत्र पूर्णपणे सिद्ध आहे. आता केवळ याला संमती मिळणे शेष आहे. संमती मिळाल्यानंतर आम्ही एक प्रयोग करून दाखवू. मी स्वतः याचा वापर करीन, असेही त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्‍नावर उत्तर देतांना स्पष्ट केले.

२. या यंत्राचा प्रयोग मेंढी, डुक्कर आणि माकड यांच्यावर करण्यात आला आहे. माकडाच्या डोक्यात ही चिप बसवल्यानंतर त्याला ‘व्हिडिओ गेम’ खेळण्यास शिकवण्यात आले आणि तो नंतर ते खेळू लागला होता.