गायक मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक

गायक मुसेवाला (उजवीकडे) याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार (डावीकडे)

अमृतसर (पंजाब) – पंजाबमध्ये २९ मे या दिवशी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली. त्याला २० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी कह्यात घेतले होते; मात्र याची कोणतीही माहिती त्यांनी भारताला दिली नव्हती. आता भारतीय गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाल्यानंतर त्या अमेरिकी यंत्रणांशी संपर्क साधत आहेत. ब्रारविरुद्ध २ जुन्या प्रकरणांमध्ये यापूर्वीच ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली आहे. जगभरातील पोलीसदलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हव्या असलेल्या फरारी लोकांविषयी सतर्क करण्यासाठी ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात येते.

१. मुसेवाला याच्या हत्येच्या वेळी गोल्डी ब्रार कॅनडामध्ये रहात होता. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने कॅलिफोर्नियात पलायन केले. तेथील फ्रेस्नो शहरात तो गेला होता. तेथे जाऊन त्याने २ अधिवक्त्यांच्या साहाय्याने राजकीय आश्रय मिळवण्याचाही प्रयत्न केला.

२. यापूर्वी मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल आणि भाचा सचिन थापन यांनाही अटक करण्यात आली आहे. अनमोल याला दुबईतून, तर सचिन याला अझरबैजानमधून अटक करण्यात आली होती.

३. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील फरीदकोटमध्ये पोलीस संरक्षण असतांना डेरा सच्चा सौदा संप्रदायाचे भक्त प्रदीप सिंह याची हत्या करण्यात आली होती. त्याचेही दायित्व गोल्डी ब्रार याने घेतले होते.

संपादकीय भूमिका

विदेशात राहून भारतात एखाद्याची हत्या केली जाऊ शकते, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !