भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘अय्यप्पा माळ’ परिधान करणार्‍या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला !

अय्यप्पा भक्तांकडून शाळेच्या समोर निदर्शने

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील ‘अय्यप्पा स्वामी मोहनस’ शाळेत ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याला ‘अय्यप्पा माळ’ परिधान केल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थ्याच्या वर्गशिक्षकाने त्याला शिवीगाळ केली आणि त्याने गळ्यात घातलेली ‘अय्यप्पा माळ’ काढण्यास भाग पाडले. केरळमधील शबरीमला यात्रेच्या अय्यप्पा स्वामीचे दर्शन घेण्यासाठी ४१ दिवस उपवास करावा लागतो. ते व्रत करणारे काळे वस्त्र धारण करून टिळा लावतात. हे व्रत वर्गातील काही विद्यार्थी करत होते. या विद्यार्थ्यांनाही त्यांनी परिधान केलेले काळे वस्त्र काढण्यास आणि कपाळावरील टिळक पुसून टाकण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ अय्यप्पा स्वामी भक्तांनी शाळेच्या समोर निदर्शने केली आणि विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याची मागणी केली.

अशाच प्रकारची घटना २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मंदामरी येथील सिंगरेनी शाळेमध्ये १० वीच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात घडली होती. त्याने अय्यप्पा माळ परिधान केल्यामुळे त्याला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला अय्यप्पा माळ परिधान केल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारल्याचा आरोप केला होता.

(‘अय्यप्पा माळ’ ही रुद्राक्ष, रक्तचंदन, तुळस यांपासून बनवली जाते.)  

संपादकीय भूमिका

  • अय्यप्पा स्वामींच्या नावाने चालणार्‍या शाळेत मुलांना अय्यप्पा माळ परिधान करण्यास मज्जाव केला जात असेल, तर ते संतापजनक होय !
  • हिंदूबहुल भारतात हिंदु मुलांना धार्मिक, नैतिक आणि बौद्धिक दृष्ट्या संपन्न करणार्‍या शाळांमध्येच हिंदु पाल्यांनी त्यांच्या मुलांना घालावे. तसेच अशा शाळांची निर्मिती करण्याचे दायित्व देशातील हिंदु समाजधुरिणांनी घेणे आवश्यक !