श्रीलंकेच्या नौदलाकडून २४ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ५ नौकाही जप्त

सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप

प्रातिनिधिक छायाचित्र

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून २४ भारतीय मासेमार्‍यांना अटक केली, तसेच त्यांच्या ५ नौकाही जप्त केल्या आहेत. श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले की, यावर्षी आतापर्यंत एकूण २५२ भारतीय मासेमारांना अशा प्रकारच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पत्र लिहून या घटनेची माहिती देत मासेमारांच्या सुटकेची आणि त्यांच्या नौका सोडवण्याची मागणी केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, श्रीलंकेचे नौदल सातत्याने भारतीय मासेमार्‍यांना अटक करत असल्याने मासेमार्‍यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हे मासेमारांची उपजीविका पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती भारतीय तटरक्षक दल आणि नौदल भारतीय मासेमारांना का देत नाही ? किंवा या सीमेजवळ ती ओळखता येण्यासारखे चिन्ह का लावत नाही ?
  • जर श्रीलंका जाणीवपूर्वक भारतीय मासेमार्‍यांना अटक करत असेल, तर भारताने अशा कारवाईच्या विरोधात श्रीलंकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !