जिनपिंग यांच्या त्यागपत्राची मागणी
शांघाय – चीनमधील अन्यायी जिनपिंग यांच्या सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून चीनमध्ये लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या विरोधात २६ नोव्हेंबरला येथे चिनी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘आम्हाला कोरोनाची चाचणी नको, तर स्वातंत्र्य हवे’, ‘दळणवळणबंदी मागे घ्या’, अशा घोषणा देत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या त्यागपत्राची मागणी केली. या आंदोलनासाठी नागरिक दळणवळणबंदी झिडकारून रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात अनेक ठिकाणी झटापटी झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना कह्यात घेतले आहे. या आंदोलनाचा व्हिडिओ अमेरिकेचे पत्रकार जॉयस करम यांनी प्रसारित केला आहे. दळणवळण बंदीच्या काळात एका इमारतीला आग लागून १० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे सांगितले जात आहे.