पोलंडवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे २ जण ठार

क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप रशियाने फेटाळला !

मॉस्को (रशिया) – रशियाचा शेजारी देश असलेल्या पोलंडमध्ये २ क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने २ जण ठार झाले. यामागे रशिया असल्याचा दावा केला जात असतांना रशियाने मात्र त्याने क्षेपणास्त्र डागले नसल्याचे सांगितले आहे. ‘आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत’, असे रशियाकडून सांगितले जात आहे. पोलंड सरकारने रशियाच्या राजदूताला या घटनेवर तातडीने स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी दूरभाषवर या प्रकरणी चर्चा केली. ‘नाटो’ने सांगितले की, ते पोलंडमध्ये क्षेपणास्त्र पाडल्याचे अन्वेषण करत आहेत. ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’) ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे.

१. क्षेपणास्त्र पडल्याच्या वृत्तानंतर पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विषयांवर चर्चा केली गेली. सरकारचे प्रवक्ते पिओटर मुलर यांनी ही माहिती दिली.

२. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी ‘प्राथमिक अंदाजानुसार डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशियन बनावटीचे आहे; मात्र आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. हे क्षेपणास्त्र नेमके कुणी डागले, हे अद्याप निश्‍चितपणे समजलेले नाही. आमची यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. आम्ही आमची सैनिकी सिद्धता करत आहोत,’ असे सांगितले आहे.

३. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की म्हणाले की, आतंकवाद केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही. ‘नाटो’च्या सीमेवरील आक्रमण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रशियावर कारवाई झालीच पाहिजे.