मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सिद्धतेविषयी पहाणी

५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सिद्धतेची पहाणी करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त उभारलेल्या पायाभूत रचनेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १४ नोव्हेंबरला पहाणी केली. येत्या २० ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा चित्रपट महोत्सव होणार असून गोव्यातील मनोरंजन सोसायटीकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

गोवा मनोरजंन संस्थेजवळची कमान
पणजीतील मॅकेनिझ प्लाझाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली चित्रपट महोत्सवाची कमान

मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे आणि इतर अधिकारी यांच्यासह चित्रपट महोत्सवाच्या स्थळाला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांविषयी पहाणी केली, तसेच या वेळी त्यांनी मांडवी नदीवर होणार्‍या ‘फिल्म बझार’च्या सिद्धतेविषयी पहाणी केली.

या वेळी ते पत्रकारांना म्हणाले, ‘‘कोरोना महामारीनंतर मोठ्या प्रमाणात होणार्‍या या चित्रपट महोत्सवात भाग घेण्याची उत्सुकता प्रतिनिधींना आहे. मी या चित्रपट महोत्सवातील सर्व स्थळांची पहाणी केली असून यासंबंधीचे काम योग्य मार्गावर आहे. १८ नोव्हेंबरपासून प्रतिनिधी गोव्यात यायला प्रारंभ होईल. हा चित्रपट महोत्सव सर्वांत चांगला होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

या वेळी गोवा मनोरंजन सोसायटीचे सदस्य शर्मद रायतुरकर म्हणाले, ‘‘या महोत्सवात गोव्यासाठी वेगळा विभाग ठेवण्यात आला असून त्यामध्ये गोव्यातील १० लघु चित्रपट आणि फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. गोव्यातील निमंत्रित चित्रपट निर्मात्यांकरता खास मास्टर क्लासेस असणार आहेत. या मास्टर क्लासमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.’’