अ.भा. वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांची चेतावणी
मुंबई, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील आतंकवादी आक्रमणांमध्ये हुतात्मा झालेले सैनिक, पोलीस आणि नागरिक यांना आपण प्रतिवर्षी श्रद्धांजली वहातो. त्यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली वहायची असेल, तर येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी, अन्यथा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने हिंदु व्यापार्यांना ‘त्रिशूल’ प्रमाणपत्र वितरित केले जाईल, अशी घोषणा या महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘या प्रमाणपत्राचा प्रारंभ मी स्वत:च्या उत्पादनांपासून करीन’, असेही या वेळी डॉ. जंगम यांनी सांगितले. या वेळी महासंघाचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता आशिष आनंद, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हलाल सक्तीविरोधी समितीचे सचिव श्री. सागर चोपदार हेही उपस्थित होते. राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मुसलमान व्यक्तिरिक्त अन्य धर्माच्या ग्राहकांना हलाल पदार्थांची सक्ती करता येणार नाही, असे या वेळी अधिवक्ता आशिष आनंद यांनी म्हटले.
अशी आहे त्रिशूल प्रमाणपत्रांची संकल्पना !
ज्या प्रमाणे ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणार्या आस्थापनांच्या उत्पादनांवर ‘हलाल’चा ‘लोगो’ छापला जातो. त्याप्रमाणे आम्ही ‘त्रिशूल प्रमाणपत्र’ देणार आहोत. हे प्रमाणपत्र घेणार्या आस्थापनांच्या उत्पादनांवर ‘त्रिशूल’चे चित्र असेल. सर्व आस्थापनांना आणि समस्त हिंदू व्यापार्यांना ‘त्रिशूल’ प्रमाणपत्र घेण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. माझे स्वत:चेही आयुर्वेद उत्पादनांचे आस्थापन आहे. मी स्वत:च्या आस्थापनाच्या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेऊन याला प्रारंभ करणार आहे, असे या वेळी डॉ. विजय जंगम यांनी सांगितले.
डॉ. जंगम पुढे म्हणाले, ‘‘मुंबईसह भारतात हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. ‘हलाल प्रमाणपत्र न घेतल्यास विशिष्ट समुदायातील लोक उत्पादनांवर बहिष्कार टाकतील’, अशी भीती घातली जात आहे. खाद्यपदार्थ आणि औषधे यांना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारच्या अधिकृत संस्था असतांना ‘हलाल प्रमाणपत्रासारख्या खासगी प्रमाणपत्राची सक्ती कशासाठी ? यातून मिळणार्या पैशांचा हिशेब केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार यांच्याकडे आहे का ? हा सर्व पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. ‘जमियत-उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ उघडपणे आतंकवादी कारवायांतील आरोपींचे वकीलपत्र स्वीकारत आहे. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचे खटले लढवण्यासाठी हलाल प्रमाणपत्र देणार्या इस्लामी संघटनांकडून आर्थिक साहाय्य केले जात आहे. आम्ही केंद्र सरकारला स्पष्ट चेतावणी देतो की, ‘२६/११’ आक्रमणात मृत्यू पावलेल्या निष्पाप जिवांना श्रद्धांजली वहायची असेल, तर सर्वांत अगोदर आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारे हलाल प्रमाणपत्र त्वरित बंद करावे.’’
हलाल प्रमाणपत्र देणार्या सर्व आस्थापनांची ‘ईडी’ ने चौकशी करावी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
भारतामध्ये हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनांकडून आतंकवादी कारवायांतील आरोपींचे खटले लढण्यातसाठी अर्थसाहाय्य होत असल्याची माहिती आम्ही मुंबई पोलिसांना दिली आहे. हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा नेमका कशासाठी वापरला जातो यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) अन्वेषण करण्यात यावे. भारत हे शरियतवर नव्हे, तर राज्यघटनेनुसार चालणारे राष्ट्र आहे. इस्लामी राष्ट्रांमध्ये हलाल प्रमाणित पदार्थ विकले जातात; मात्र भारतात मुसलमानांची लोकसंख्या अल्प असतांना भारतात हलाल प्रमाणपत्राची सक्ती कशासाठी ? भारतातील हिंदूंनी हलाल प्रमाणित पदार्थ का घ्यावेत ?
संपूर्ण देशात हलाल प्रमाणपत्राची सक्ती बंद होईपर्यंत आंदोलन चालू राहील ! – सागर चोपदार, सचिव, हलाल सक्तीविरोधी समिती
हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीला विरोध करण्यासाठी हलाल सक्तीविरोधी समितीच्या आतापर्यंत ४२ बैठका झाल्या आहेत. हलाल प्रमाणपत्राविरोधी आंदोलनाला संपूर्ण राज्यात हिंदूंचा पाठिंबा मिळत आहे. हलाल प्रमाणपत्र केवळ मांसापुरते नसून औषधे, सौंदर्यप्रसाधने यांसह सर्व उत्पादनांसाठी हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या आंदोलनामुळे मुंबईत होणारी हलाल सक्तीविरोधी परिषद रहित झाली असली, तरी भारतातून हलाल प्रमाणपत्राची सक्ती बंद होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील.