ट्विटरच्या नव्या नियमांमध्ये ‘स्वस्तिक’ला ठरवले द्वेषाचे प्रतीक !

हिंदूंकडून पालट करण्याची मागणी !

नवी देहली – ट्विटरने नुकतेच त्याच्या नियमांमध्ये काही पालट केले आहेत. यात त्याने ‘स्वस्तिक’ला नाझीचे चिन्ह ठरवून त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ म्हटले आहे. यावर सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून ‘स्वस्तिक आणि नाझीचे ‘हुक्ड क्रॉस’ यांच्यात भेद आहे’, असे सांगत स्वस्तिक ऐवजी ‘हुक्ड क्रॉस’ला ट्विटरवरून हटवण्याची मागणी केली.

अमेरिकेतील हिंदूंची संघटना ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने ट्वीट करून म्हटले आहे, ‘तुम्ही नियमांमध्ये केलेल्या पालटाविषयी विचार करावा आणि हिंदु धर्मियांची श्रद्धा असणार्‍या स्वस्तिक चिन्हाला नाझीच्या ‘हेकेनक्रेज’ किंवा ‘हूक्ड क्रॉस’ यांच्यापेक्षा वेगळे असल्याचे दाखवावे.’ यासह या ट्वीटसमवेत हिंदूंच्या स्वस्तिकविषयी सर्व माहिती असणारी ‘लिंक’ही दिली आहे.