फ्रान्समधील नियतकालिकाने व्यंगचित्राद्वारे कतारला दाखवले जिहादी आतंकवादी !

कतारला फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यावरून टीका

फ्रान्समधील नियतकालिकाने छापलेले व्यंगचित्र

नवी देहली – येत्या २० नोव्हेंबर या दिवशी कतार या कट्टर इस्लामी देशामध्ये जागतिक फूटबॉल विश्‍वचषक स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. इस्लामी देशांतील कडक कायद्यांमुळे खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यामध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रान्समधील फ्रेंच भाषेतील नियतकालिक ‘लु कॅना हौसेने’ (Le Canard enchaine) मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात खेळाडूंचे टी शर्ट दाखवण्यात आले असून त्यावर इस्लामी आतंकवाद्याचा चेहरा रेखाटण्यात आला आहे. या टी शर्टवर ‘कतार’ असे लिहिण्यात आले आहे. याच्या शेजारी चाकू, बंदुक आणि रॉकेट लाँचरही दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्राचा कतारने निषेध केला असून जगभरातील मुसलमानही त्यास विरोध करत आहेत. त्यांनी याला वांशिक, इस्लामच्या द्वेषाने प्रेरित, तसेच अवमानकारक म्हटले आहे. सामाजिक माध्यमांतूनही यास विरोध होत आहे.

कतारला या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर ‘फिफा’चे (‘आंतररारष्ट्रीय फुटबॉल संघटने’चे) माजी अध्यक्ष सेप ब्लास्टर यांनी म्हटले होते की, कतारला यजमानपद देऊन मी मोठी चूक केली आहे. हा एक वाईट पर्याय होता. त्या वेळी मीच ‘फिफा’चा अध्यक्ष असल्याने याला मीच उत्तरदायी आहे.

फ्रान्समधील फ्रेंच नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’ने वर्ष २०१५ मध्ये महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यामुळे त्याच्या कार्यालयावर आक्रमण करण्यात आले होते. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. ‘व्यंगचित्र प्रसिद्ध करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते’, असे या नियतकालिकाने म्हटले होते.