सोलापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एम्.आर्.आय. चाचणी यंत्र मागील १ सप्ताहापासून बंद आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागांतील सहस्रो रुग्ण या रुग्णालयात उपचार घेतात. अनेक उपचार या चाचणी अहवालावर अवलंबून असतात. एम्.आर्.आय. यंत्र बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यंत्र बंद असल्याने रुग्णालय प्रशासन रुग्णांना खासगीमध्ये जाऊन ही चाचणी करण्यास सांगत आहे. खासगीमध्ये चाचणी करण्यासाठी ५ ते ६ सहस्र रुपये व्यय होतो. गरीब रुग्णांना हा व्यय परवडणारा नसल्यामुळे लवकरात लवकर ही सुविधा पूर्ववत् करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. (आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन समस्येवर तत्परतेने उपाययोजना काढणे आवश्यक आहे. – संपादक)