सत्यप्रिय, सात्त्विक वृत्ती आणि साधनेची आवड असलेले पेण, रायगड येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. जगन्नाथ नरहरि आठवले (वय ९४ वर्षे) !

फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. सुरेंद्र आठवले यांचे वडील पेण, रायगड येथील जगन्नाथ नरहरि आठवले (वय ९४ वर्षे) यांचे १६.११.२०२१ या दिवशी निधन झाले. वर्ष २०१८ मध्ये त्यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. कार्तिक शुक्ल द्वादशी (५.११.२०२२) या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने कै. आठवले आजोबा यांचा मुलगा श्री. सुरेंद्र आठवले आणि सून सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले यांनी दिलेल्या त्यांच्या काही आठवणी पुढे दिल्या आहे.

कै. जगन्नाथ आठवले

१. श्री. सुरेंद्र आठवले (कै. जगन्नाथ आठवले यांचा मुलगा), फोंडा, गोवा.

श्री. सुरेंद्र आठवले

१ अ. खोटे बोलायला नकार दिल्यामुळे मुंबईतील नामांकित आस्थापनातील नोकरी सोडावी लागणे : ‘माझे वडील (ती. अण्णा) मुंबईतील एका नामांकित आस्थापनात नोकरी करायचे. तेव्हा ‘खोटे बोलावे लागते’, या एका कारणामुळे त्यांनी त्यांची नोकरी सोडली. यातून त्यांचे ‘खोटे न बोलणे आणि सत्याने वागणे’, हे गुण लक्षात आले. नोकरी सोडल्यानंतर ते वढाव (ता. अलिबाग, जि. रायगड) या त्यांच्या मूळ गावी शेती करण्यासाठी गेले.

१ आ. श्रीरामावरील श्रद्धेमुळे मोठ्या अपघातातूनही ती. अण्णा बरे होणे : शेती करत असतांना वयाच्या ७० व्या वर्षांपर्यंतच्या काळात जवळजवळ ६ वेळा अण्णांना मोठे अपघात झाले. श्रीरामावरील श्रद्धा आणि प्रबळ इच्छाशक्ती यांमुळे अधिक वेदना न होता प्रत्येक अपघातातून ते बरे झाले.

१ इ. अण्णा घरी आल्याची चाहूल लागताच गोठ्यातील बैलांनी हंबरून अण्णांना बोलवणे आणि त्यांनी गोठ्यात जाऊन बैलांच्या पाठीवरून हात फिरवल्यावर बैल शांत होणे : शेतीच्या कामासाठी आमच्याकडे बैलजोडी होती. अण्णा त्या बैलांशी माणसांप्रमाणे बोलायचे. एखाद्या दिवशी अण्णा काही कामासाठी दिवसभर बाहेर गेले असले की, त्यांना घरी यायला उशीर व्हायचा. अण्णा घरी आल्याची चाहूल लागताच बैल हंबरत रहायचे. अण्णांनी गोठ्यात जाऊन बैलांच्या पाठीवरून हात फिरवल्यावरच ते शांत व्हायचे.

२. सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले (कै. जगन्नाथ आठवले यांची सून), फोंडा, गोवा.

सौ. सुप्रिया आठवले

२ अ. वक्तशीरपणा : ‘माझे सासरे, म्हणजे ती. अण्णा नेहमी पहाटे ५ वाजताच उठायचे आणि १ घंटा नामजप करायचे. त्यानंतर ६.३० वाजता त्यांच्या नित्यकर्मांना आरंभ व्हायचा. ते दिवसभरातील प्रत्येक कृती त्यांच्या ठरलेल्या वेळेतच करायचे. यात त्यांचे सातत्य होते. यातून त्यांचा ‘वक्तशीरपणा’ हा गुण मला शिकायला मिळाला.

२ आ. प्रसंगी नोकरी जाण्याची वेळ येऊनही प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानी वृत्ती न त्यागणे : अण्णा मुंबईत एका ‘मिल’मध्ये नोकरी करत होते. एकदा ‘मिल’मध्ये ते नेहमीच्या प्रवेशद्वारातून (‘एन्ट्री गेट’मधून) आत गेले; परंतु तेथील ‘वॉचमन’ ‘तुम्ही मिलमधून बाहेर जाण्याच्या द्वारातून आत आला आहात’, असे म्हणून त्यांची चूक सांगू लागला. ही चूक मान्य करण्यासाठी वॉचमन अण्णांवर बळजोरी करत होता. त्या वेळी अण्णांनी ‘मी चूक केली नाही. त्यामुळे मी ती मान्य करणार नाही’, असे ठामपणे सांगितले. या कारणास्तव मिलमधील त्यांची नोकरी गेली; परंतु त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सोडला नाही.

२ इ. समाधानी वृत्तीमुळे पूजेसाठी अन्य घरी गेल्यावर दक्षिणेची रक्कम न मागणे : प्रतिवर्षी श्री गणेशचतुर्थीच्या काळात घरोघरी श्री गणपतीचे पूजन केले जाते. त्या वेळी अण्णा इतरांकडे पौरोहित्यासाठी जायचे आणि त्यांना जी दक्षिणा मिळेल, ती समाधानाने स्वीकारायचे. ‘पूजेची अमुक दक्षिणा द्या’, असे ते कोणालाही सांगत नसत. गणपति विसर्जनाच्या दिवशी मूर्तीसमोर ठेवलेली फळे लोक पुरोहितांना (गुरुजींना) देतात. तेव्हा अण्णा १ – २ फळेच स्वतःसाठी घ्यायचे आणि ‘बाकी सर्व फळे तुमच्या घरात प्रसाद म्हणून सर्वांना द्या’, असे प्रेमाने सांगायचे.

(‘कै. ती. अण्णांचे हे वर्तन आदर्श असून सर्वत्रच्या पुरोहितांसाठी अनुकरणीय आहे.’ – संकलक)

२ ई. अण्णांनी सेवेत स्वतःहून साहाय्य करणे : वर्ष १९९८ मध्ये आम्ही चिंचवड, पुणे येथे रहात असतांना ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून साधना आणि सेवा करू लागलो. त्या वेळी आमच्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक येत. ते मोजून त्यांचे गठ्ठे करण्याची सेवा माझ्याकडे होती. कधी कधी चिंचवडला आमच्याकडे सासू-सासरे येत आणि १५ – २० दिवस रहात. त्या वेळी अण्णा स्वतःहून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक मोजण्यास मला साहाय्य करत.

२ उ. सनातनच्या ग्रंथांचे वाचन करण्याची आवड : अण्णांनी ‘सनातन संस्थे’ने प्रकाशित केलेल्या सर्व ग्रंथांचे वाचन केले होते. त्यांना ‘शिष्य’ हा ग्रंथ पुष्कळ आवडायचा. त्या वेळी माझे यजमान श्री. आठवले सनातनच्या ग्रंथांशी संबंधित सेवा करायचे.

२ ऊ. गुरुपौर्णिमेला प्रतिवर्षी न चुकता अर्पण करणे : ‘गुरुपौर्णिमेच्या काळात साधक अर्पण मिळवण्याची सेवा करतात’, हे आम्ही अण्णांना सांगितले होते. तेव्हापासून प्रतिवर्षी न चुकता ते काही रक्कम अर्पण करायचे. ’

प्रार्थना आणि कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने कै. ती. अण्णांची आध्यात्मिक उन्नती होऊन वर्ष २०१८ मध्ये त्यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. ‘यापुढेही त्यांची उत्तरोत्तर प्रगती करून घ्यावी’, ही प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना ! कै. ती. अण्णांविषयी लिखाण लिहून घेतल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

(सर्व सूत्रांचा दिनांक २४.१०.२०२२)