५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातुन पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील कु. अनया रोहित महाकाळ (वय १४ वर्षे) हिने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

कु. अनया रोहित महाकाळ हिला १४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

उच्च लोकातुन पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदू राष्ट्र (सनातन धर्म राज्य ) चालवणारी पिढी ! कु. अनया महाकाळ ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. अनया रोहित महाकाळ  उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची  ५५ टक्के पातळीचा आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.८.२०२२)

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील कु. अनया रोहित महाकाळ (वय १४ वर्षे) हिला वाईट शक्तींनी ती, तिची आई आणि बहीण यांच्यावर केलेल्या आक्रमणाविषयी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. अनया हिची आध्यत्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)

कु. अनया महाकाळ

१. मोठ्या वाईट शक्तीने केलेले आक्रमण !

१ अ. एका नातेवाइकाने केलेल्या भ्रमणभाषच्या माध्यमातून ‘वाईट शक्तींनी आई आणि लहान बहीण यांच्यावर आक्रमण केले आहे’, असे लक्षात येणे : ‘१.६.२०२० या दिवशी आईला एका नातेवाइकांचा भ्रमणभाष (व्हिडिओ कॉल) आला होता. त्यांच्याशी आई (सौ. प्राची महाकाळ), मी आणि हिमानी (लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के, वय ९ वर्षे) बोललो. तेव्हापासून आम्हा तिघींना अस्वस्थ आणि विचित्र जाणवत होते. नंतर मी त्या घटनेचे सूक्ष्म परीक्षण केले. तेव्हा ‘आमच्यावर वाईट शक्तींनी आक्रमण केले असून आई आणि हिमानी यांच्यावर भयंकर आक्रमण झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले. आईच्या सहस्रारचक्रावर आक्रमण झाल्यामुळे मला तिची सप्तचक्रे दूषित झाल्याची दिसत होती.

सौ. प्राची महाकाळ

१ आ. नामजपाला बसल्यावर आईला काहीच न सुचणे, तेव्हा ‘तिच्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण कसे झाले ?’, याचे सूक्ष्म चित्र काढून दाखवल्यावर ती घाबरणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर देवाच्या कृपेने साधिकेला भावजागृतीचे प्रयत्न करायचे सुचणे : ३.६.२०२० या दिवशी घरातील मोगर्‍याच्या रोपावर ३ फुले फुलली होती. त्यापैकी एक फूल आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला वाहिले. त्यानंतर आई नामजप करायला बसली; पण तिला काहीच सुचत नव्हते. मी तिला भ्रमणभाषमध्ये ‘तिच्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण कसे झाले ?’, याचे सूक्ष्म चित्र काढून दाखवले. ते पाहून ती पुष्कळ घाबरली. आम्ही गुरुदेवांना शरण गेलो. आईने गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, मला काहीच सुचत नाही. मी काय करू, ते तुम्ही मला सांगा.’ तेव्हा देवाच्या कृपेने माझ्या मनात विचार आला, ‘भावजागृतीचे प्रयत्न केले, तर तिला चैतन्य मिळेल.’ तसे मी आईला सांगितले. त्यानुसार आम्ही भावजागृतीचे प्रयत्न करण्यास आरंभ केला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यावर ‘ते सूक्ष्मातून घरी आले असून सुखासनावर बसले आहेत’, असे जाणवणे : आम्ही गोव्याला रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा आमची गुरुदेवांशी भेट झाली होती. तो प्रसंग आईला आठवला आणि तिची भावजागृती झाली. तेवढ्यात ‘गुरुदेव आमच्या समोर सूक्ष्मातून प्रकट झाले’, असे मला दिसले. ‘गुरुदेव आमच्या घरातील बैठककक्षात फिरून नंतर सुखासनावर बसले’, असे मला दिसले. मी आईला सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्या घरी आले आहेत.’’ तेव्हा तिला पुष्कळ आनंद होऊन तिची भावजागृती झाली. गुरुदेव आम्हाला म्हणाले, ‘तुम्ही मला बोलावले; म्हणून मी आलो !’

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सूक्ष्मातून झालेल्या संभाषणातून ‘अंतरात्म्यावर आलेले आवरण कसे काढायचे ?’, ते शिकायला मिळणे

आई (मला उद्देशून) : ‘परात्पर गुरु डॉक्टरांना ‘माझा भाव अल्प पडतो’, असे सांग.

परात्पर गुरु डॉ. आठवले : मग हा काय आहे ?

मी (अनया) : कालपासून एका नातेवाइकांशी बोलल्यापासून आमच्यावर सतत आवरण येत आहे. त्याचे कारण काय ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : मनात जे विचार येत आहेत, ते लिहून तो कागद जाळून टाका.

आईने तिच्या मनात येणारे सर्व विचार कागदावर लिहिले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला त्या नातेवाईकाच्या अंतरात्म्यावरचे आवरण दाखवले. ‘त्या नातेवाईकाच्या डोळ्यांच्या माध्यमातून हे आक्रमण झाले असून आईवर झालेल्या आक्रमणाचा परिणाम ३ दिवस रहाणार आहे’, असेही मला जाणवले. तेव्हा ‘अंतरात्म्याचे आवरण कसे काढायचे ?’, ते मला समजले.

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन आणि प्रत्येक क्षणी आपल्या समवेतच असतात’, याची आलेली अनुभूती

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईला अर्धा घंटा नामजप करायला सांगणे : मनातील विचार लिहिलेला कागद जाळण्यासाठी आई सज्जात (गॅलरीत) गेल्यावर गुरुदेवही तिच्या मागे तिकडे गेले. तिथे मोगर्‍याचे झाड होते आणि त्याला फुले आली होती. त्यांनी मोगर्‍याला हात लावला आणि म्हणाले, ‘मोगरा छान फुलला आहे.’ आम्ही आत आल्यावर त्यांनी मला विचारले, ‘आई ३० मिनिटे नामजप करू शकते का ?’ मी आईला तसे सांगितल्यावर ती नामजप करायला बसली.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘मी प्रतिदिनच येणार आहे आणि इथेच असणार आहे, आता जोरात साधना करा’, असे आईला सांगणे : तेवढ्यात आजीचा (वडिलांची आई, सौ. स्वाती महाकाळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६८ वर्षे) यांचा) भ्रमणभाष आला. आई नामजप करत बसली होती; म्हणून मी भ्रमणभाष घेतला. त्या वेळी आमच्यामध्ये झालेला संभाषण येथे दिले आहे.

मी (अनया) : आमच्याकडे सूक्ष्मातून गुरुदेव आले आहेत.

आजी (सौ. स्वाती महाकाळ आनंद होऊन) : गुरुदेव गेल्यावर मला भ्रमणभाष कर.

परात्पर गुरु डॉ. आठवले (हसून) : मी जाणारच नाही. इथेच थांबणार आहे. आता अडकलीस ना !

थोड्या वेळाने मी आजीला भ्रमणभाष केला.

आजी : गुरुदेव आहेत कि गेले ?

मी : आहेत अजून.

आजी : त्यांना एकटे ठेवू नको. तू त्यांच्या समवेत थांब.

परात्पर गुरु डॉ. आठवले : मी एकटा कुठे आहे ? तुम्ही आहातच की, माझ्या समवेत !

थोड्या वेळाने परात्पर गुरु डॉक्टर उठले आणि जायला निघाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नमस्कार ! आता मी निघतो. (आईला उद्देशून) आता जोरात साधना करा.

आई : पुन्हा केव्हा येणार ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : मी प्रतिदिनच येणार आहे.

आईचा नामजप पूर्ण झाल्यावर ती प.पू. भक्तराज महाराज यांचे एक भजन म्हणत असतांना पुन्हा गुरुदेव घरी आले आणि म्हणाले, ‘भजन किती छान म्हणत आहेत ? मी निघतो. नमस्कार.’

३ इ. ‘तुमच्या कुटुंबावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत असल्यामुळे शुद्धी करण्यासाठी येत आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : त्याच दिवशी संध्याकाळी ८.३० वाजता आम्ही सर्व जण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कोरोना प्रतिबंधनासाठी सांगितलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः। श्री गुरुदेव दत्त ।  श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः। ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करण्यासाठी बसलो होतो. तेव्हा पुन्हा गुरुदेव घरी आले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला गुरुदेव सतत आमच्या घरी येतांना का दिसत आहेत ?’ तेव्हा ते म्हणाले, ‘तुमच्या कुटुंबावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यामुळे शुद्धी करण्यासाठी मी येत आहे. आता मी निघतो.’

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आईला स्वयंपाक करतांना नामजपाला बसण्याचे स्मरण करून देणे आणि ‘ती नामजप करतांना ते तिच्या जवळ उभे आहेत’, असे दिसणे : ४.६.२०२० या दिवशी आई सकाळी नामजप करायला बसली. तेव्हा मला ‘तिच्या समोर गुरुदेव उभे आहेत’, असे दिसले. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘मी निघतो. नमस्कार !’ रात्री ८.१५ वाजता मी आईला स्वयंपाकघरात साहाय्य करत असतांना ‘गुरुदेव आईच्या मागे उभे आहेत’, असे मला दिसले. ते आम्हाला म्हणाले, ‘आज नामजप करायला बसला नाहीत का ?’ मग स्वयंपाक झाल्यावर आम्ही नामजप करायला बसलो. तेव्हा ‘गुरुदेव आमच्या समोर बसले आहेत’, असे मला दिसले. त्यांनी मला चित्राच्या साहाय्याने बाह्य आणि अंतर मन दाखवले अन् ‘मन आणि बुद्धी यांवरील आवरणे कशी पहायची ?’, तेही दाखवले.

३ उ. आईवर झालेल्या आक्रमणामुळे ती नामजप करतांना तिची चक्रे काळी दिसणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तिची कापराने दृष्ट काढा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ने आवरण काढा’, असे सांगणे : ५.६.२०२० या दिवशी आई नामजप करत असतांना मला ‘तिचे सहस्रार आणि आज्ञा ही चक्रे आवरणामुळे काळी दिसत होती. आईवर आक्रमण झाले होते. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आईच्या समोर उभे आहेत’, असे मला दिसले. ते मला म्हणाले, ‘आईची कापराने दृष्ट काढ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ने तिच्यावरील आवरण काढ.’ तसे केल्यावर तिच्यावरील आवरण निघून गेले.

३ ऊ. संध्याकाळी नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वाईट शक्ती आक्रमणे कशी करतात ?’, ते दाखवणे : संध्याकाळी नामजप करतांना ‘गुरुदेव आमच्या समोर बसले आहेत’, असे मला दिसले. त्यांनी ‘केसांच्या माध्यमातून वाईट शक्ती आक्रमणे कशी करतात ? आणि क्रिकेट खेळ पहातांना वाईट शक्ती शरिरात कशी कार्य करते ?’, हे चित्राच्या माध्यमातून मला शिकवले.

३ ए. आई नामजप करत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्या सर्व चक्रांची शुद्धी केल्यामुळे ‘तिच्या शरिरात चैतन्य जात आहे’, असे दिसणे : रात्री ९.३० ते १० या ध्यानाच्या वेळेत आई-बाबा नामजपाला बसले होते. तेव्हा गुरुदेवांनी आईच्या सर्व चक्रांची शुद्धी केली. त्यामुळे ‘ईश्वरी चैतन्य आईच्या शरिरात जात आहे’, असे मला दिसले.

४. आक्रमण करणार्‍या वाईट शक्तीचे चित्र काढतांना झालेला त्रास !

मोठ्या वाईट शक्तीचे चित्र काढतांना मला माझ्या अनाहतचक्राच्या भोवती दाब जाणवत होता. आमच्याशी बोललेल्या नातेवाइकाचे चित्र काढतांना माझे डोके दुखून मला अनाहतचक्राच्या ठिकाणी दाब जाणवत होता. मला मळमळल्यासारखे होत होते. ‘अनाहतचक्राच्या ठिकाणी कुणी तरी पकडले आहे’, असेही मला जाणवले. नंतर माझी कापराने दृष्ट काढली. मी नामजपला बसले, तरीही माझ्या डोळ्यांसमोर सारखा त्या व्यक्तीचा तोंडवळा येत होता.’

– कु. अनया महाकाळ (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १४ वर्षे), खांदा कॉलनी, पनवेल. (११.१०.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक