शरीरस्वास्थ्यासाठी नियमित आणि वेळेवर व्यायाम करावा. त्याच्या समवेत आहार नियंत्रित (डाएटिंग) करणे, म्हणजे उपाशी रहाणे नव्हे, तर संतुलित आहार घेणे आणि तोही वेळेवर घेणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढे उष्मांक (कॅलरीज) मिळून हृदयविकार (हार्ट प्रॉब्लेम) आणि लठ्ठपणा या समस्या उद्भवत नाहीत. वजन न्यून करण्यासाठी अल्प उष्मांक आणि अल्प चरबी असलेला आहार घेणे आवश्यक असते. व्यायामाच्या समवेत आपण योगासने केली, तर आपल्या शरिरात शक्तीसह तग धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा (स्टॅमिना) वाढेल. शरीर सुंदर आणि आकर्षक हवे असेल, तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
१. शरीर स्वास्थ्यासाठी कोणती काळजी घ्याल ?
अ. ‘टोस्ट सँडविच’वर ‘बटर’चा वापर अल्प करावा. ‘बटर’मुळे चरबी वाढते.
आ. कोशिंबिरी किंवा ‘सॅलड’वर मलई न घालता लिंबाचा वापर करावा.
इ. उपाहारगृहातील पदार्थांत चरबी अधिक असते. त्यामुळे बाहेरील पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
ई. ‘एरोबिक’ व्यायामाने (उदाहरणार्थ चालणे, धावणे, पोहणे इत्यादी हृदय आणि श्वसनसंस्था यांच्यासाठी लाभदायक अशा व्यायामाने) वजन लवकर न्यून होते अन् मांसपेशी कणखर होतात.
त्यामुळे योग्य तो विचार करून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास वजन न्यून होते. या क्रियेत पुष्कळ दिवस जातात; परंतु आपल्या शरिराला योग्य आकार मिळतो.
२. दातांसाठी घरगुती उपचार
दातांची निगा राखणे महत्त्वाचे आहे. दातांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी महागड्या दंतवैद्याची आवश्यकता नाही. आपण काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास दात निरोगी राहू शकतात. लंडनच्या एका संकेतस्थळावर पुरस्कारप्राप्त दंत चिकित्सकांनी दात निरोगी रहाण्यासाठी पुढील सोपे घरगुती उपचार सांगितले आहेत.
अ. दात प्रतिदिन ‘ब्रश’ने स्वच्छ करावेत.
आ. प्रतिदिन भोजनातील साखरेचे प्रमाण अल्प ठेवावे.
इ. ‘टूथब्रश’चे ‘ब्रिसल्स’ चांगले आहेत, तोवर तो वापरू शकतो. त्यानंतर नवीन ब्रश वापरावा.
ई. दिवसातून २ वेळा ‘ब्रश’ने दात स्वच्छ घासावेत. काही खाल्ल्यावर लगेच दात घासू नयेत.
उ. दातांना चमक येण्यासाठी ‘टूथपेस्ट’ वापरण्यासह ‘व्हाईटनर’चा उपयोग करावा.
ऊ. धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.
ए. दातांच्या कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष करू नये.’
– श्री. यतिन ठाकूर, पनवेल
(साभार : ‘श्रीपूर्णानंद वैभव’, माघी गणेशोत्सव २०१४)