फुलांची रास, चंदनाचा सुवास, दिव्यांच्या रांगा, रांगोळीचे सडे ।
सुग्रास फराळ, निसर्गाचा साज, आली दिवाळी घेऊन आनंदाचे घडे ।।
दिवाळी हा आपल्या भारत देशातील सर्वांत मोठा सण. राज्यपरत्वे काही सण पालटतात; पण दिवाळी सर्वत्र सारख्याच उत्साहाने आणि आवडीने साजरी होते. हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.
१. दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि कला या दृष्टीकोनातून महत्त्व
१ अ. धार्मिक : ‘सणांच्या व्यवस्थापनात सतत परमेश्वराचे स्मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यावर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्हणजे धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे. (येथे ‘रिलीजन’ या अर्थाने धर्म अपेक्षित नाही, तर वेदोक्त सनातन हिंदु धर्म अपेक्षित आहे. ‘ज्यात ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. मी ब्रह्म आहे आणि तूही ब्रह्मच आहेस’, हा समानतेचा श्रेष्ठ संदेश दिला आहे.)
१ आ. सामाजिक : दिवाळीच्या निमित्ताने सर्वांनी एकमेकांशी स्नेहपूर्ण वागून सामाजिक सौहार्द राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे दायित्व कुठलीही एक व्यक्ती किंवा समूह यांच्यावर न सोपवता ती सर्वांवर सारखीच विभागून दिली जाते. हे या आयोजनातील वैशिष्ट्य आहे.
१ इ. आर्थिक : उत्सवाच्या निमित्ताने फुले, रांगोळ्या, धूप, दीप, गंध, सजावट साहित्य, देवतांची वस्त्रे आणि दागिने, फळे, समया इत्यादींची मागणी वाढते. देवासमोर जागर, गोंधळ, नृत्य, संगीत, रांगोळ्या, सजावट, झाडलोट करणार्या कलाकारांना काम मिळते. एकूणच आर्थिक उलाढाल होऊन समाजातील सर्व घटकांना आर्थिक प्राप्ती होते आणि त्यांच्या उदरभरणाची व्यवस्था होते.
१ ई. आरोग्य : करियर, धर्म, मनोरंजन, सामाजिक आयुष्य, ज्यासाठी रात्रीच्या मेजवान्यांमध्ये आरोग्याची नासाडी करण्याची नवी परंपरा आपण स्वीकारली आहे. या सगळ्यांचा आस्वाद घेत असतांनाही आरोग्याला कुठेही तडा जाणार नाही; किंबहुना काहीतरी लाभच होईल, हा विचार करून सणांचे व्यवस्थापन केले जायचे, ही आपल्या ऋषींची श्रेष्ठता आहे; कारण इतर सर्व गोष्टी परत मिळवता येतात; पण आरोग्य नाही आणि याची जाणीव आपल्या पूर्वाश्रमींना होती. त्यामुळेच प्रत्येक सणाची मांडणी करतांना त्यात आरोग्याचा विचार प्राधान्याने केलेला दिसतो.
१ उ. कला : सणांच्या निमित्ताने मानवी जीवन संपन्न करणार्या विविध कला-कौशल्यांची परंपरा टिकवून ठेवली जाते.
२. मनुष्याला ज्ञान, धन आणि बळ प्राप्त करून देणारी दिवाळी !
२ अ. वसुबारस : पहिला दिवस वसुबारस. या दिवशी आपण ‘सवत्स गोमातेचे’ पूजन करतो. कृषी, आरोग्य, अर्थ, पर्यावरण या सर्व क्षेत्रांत मानवाला एकहाती संपन्नता देऊ शकणार्या गोमातेसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आहारी जाऊन आपण गोमातेला विसरलो खरे; पण आज पृथ्वी अन् त्यावरील मानवाचे आयुष्य धोक्याच्या कडेलोटावर आलेले असतांना दिसणारा आशेचा एकमेव किरण, म्हणजे गोमाता आहे. तेव्हा हिंदु परंपरा पुन्हा तेजाळून निघावी आणि पूर्वीप्रमाणेच जवळ असलेल्या ‘गोधनावरून’ आपली श्रीमंती मोजली जाण्याचे दिवस यावेत. यासाठी आपल्यालाच झटावे लागणार आहे. त्यासाठी गोमातेप्रती कृतज्ञता जपणे, ही काळाची आवश्यकता आहे.
२ आ. धनत्रयोदशी : दुसरा दिवस धनत्रयोदशीचा म्हणजेच आरोग्याच्या देवतेचा. निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना करूनच सणाचे पुढील दिवस चालू होतात. ‘निरोगी दीर्घायुष्य’ ही केवळ प्रार्थना करून प्राप्त होणारी गोष्ट नव्हे. भगवान धन्वन्तरीच्या आशीर्वादासह त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून स्वतःचे सातत्याने योग्य प्रयत्नही होणे आवश्यक आहेत. त्या मार्गावर चालायचा संकल्प करायचा हाच तो दिवस !
२ इ. नरकचतुर्दशी : तिसरा दिवस नरकचतुर्दशीचा. व्यक्ती किंवा समष्टी जीवनाचा नरक बनवणार्या सर्व अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा हा दिवस ! या दिवशी पहाटे लवकर उठण्याची परंपरा आहे. पहाटे उठण्याचे लाभ खरेतर आपल्याला सगळ्यांना चांगले ठाऊक आहेत. ब्राह्म मुहूर्तावर (म्हणजे पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास) उठल्याने मलप्रवृत्ती सुकर होते. त्यामुळे शरीर शुद्ध आणि हलके होते. शरिराच्या क्रिया सुधारतात. भूक चांगली लागते. कफाची वाढ होत नाही. त्यामुळे शरीर स्थूल होत नाही, कफाचे आजार होत नाहीत, आळस जाऊन उत्साह येतो. व्यायाम, अभ्यंग, स्नान, पूजा अशा शारीरिक आणि मानसिक आरोग्य बळकट करणार्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो.
२ इ १. अभ्यंगस्नानाने शरीर पुष्ट आणि बलवान होऊन आयुष्यवृद्धी होणे : नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायचे. पहाटेच्या गार हवेत अंगाला कोमट तेल लावून मालिश करायचे आणि सुगंधी उटणे लावून उष्ण पाण्याने अंघोळ करायची. ‘राजयोग’ म्हणतात, तो याहून वेगळा काय असतो ? अभ्यंग हे म्हातारपण, श्रम आणि वात यांना दूर ठेवणारे आहे. त्यामुळे प्रकृती दीर्घकाळ उत्तम रहाते, शरीर पुष्ट आणि बलवान होते, आयुष्य वाढते, झोप चांगली लागते आणि त्वचा सुंदर होते. उटण्याने शरीर सुगंधी, सडपातळ आणि स्थिर (कंपविरहीत) होते. यावरील उष्ण पाण्याने स्नान हे पचनशक्ती आणि भूक वाढवते, ऊर्जा आणि बल देते, तसेच खाज, मल, घाम, श्रम, आळस, तहान, दाह आणि पाप (स्नानाने तन-मनाला येणारी प्रसन्नता ही मनात वाईट विचारांना, म्हणजे पापांना थारा देत नाही.) यांचा नाश करते. याचा अर्थ ‘अभ्यंगस्नान’ या एकाच उपक्रमाचे आपल्याला कितीतरी लाभ होतात ! अभ्यंगस्नानानंतर नवीन सुंदर वस्त्र आणि अलंकार घालून मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे, शेजारी फराळ वाटप करणे या सगळ्या गोष्टींमुळे उत्साह, समूह सहवास आणि आनंद यांची नुसती उधळण असते.
२ ई. लक्ष्मीपूजन : कलियुगातील मनुष्याला लक्ष्मीपूजनाचे माहात्म्य सांगायची खरेतर आवश्यकताच नाही. ‘ती सदा सर्वदा आपल्याच घरी असावी’, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते; पण या लक्ष्मी इतके चंचल जगात कुणी नाही. ती कुणाकडेही जाते खरी; पण तिला वाटेल तेव्हा तेथून बाहेरही पडते. हे जाणून तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी या दिवशी दिव्यांची सजावट केली जाते.
यासमवेतच संतांनी सांगितलेले लक्ष्मीमातेला प्रसन्न करून घेण्याचे उपायही हवेतच. जगद्गुरु तुकोबा म्हणतात तसे, ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेंच करी’, म्हणजेच व्यवहार चोख करून पैसे मिळवावेत आणि त्यांच्यात आसक्ती न ठेवून त्यांचा व्यय करावा. तेथे अनैतिकता कामाची नाही. तसेच तिचा विनियोगही योग्य मार्गासाठी (सत्पात्रे दानासाठी) व्हायला हवा. केवळ स्वतःच्या भौतिक उपभोगांचा हव्यास घातकच ठरतो.
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
अंतरी वसता नारायणे । लक्ष्मीस काय उणे ।
ज्याची लक्ष्मी तो आपणे । बळकट धरावा ।।
अर्थ : नारायणाला अंतःकरणात बळकट धरून ठेवा म्हणजे त्याचे अखंड नामस्मरण, ध्यान, चिंतन करा. त्यामुळे त्याच्यासह असणारी लक्ष्मी आपोआपच येईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली म्हणतात, ‘मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।।’
म्हणजे ‘जीवनाला लागलेली अविवेकाची काजळी पुसून विवेकाचे दीप निरंतर लावणे, हीच योगियांची दीपावली आहे.’ या ज्ञानरूप उजेडाला भुलून लक्ष्मी येणार, हे निश्चित आहे.
२ उ. बलिप्रतिप्रदा : बळीराजा हा असुर वंशात जन्माला आला होता; पण त्याने उत्तम शासन केले आणि धर्माची वर्तणूक केली. त्यामुळे प्रसन्न होऊन ईश्वराने त्याला पाताळाचा राजा आणि चिरंजीवित्व या दोन गोष्टी प्रदान केल्या. जन्मतः आपण सगळेच क्षुद्र असतो; पण ज्ञान, धार्मिक वागणूक आणि ईश्वरकृपा यांच्या माध्यमातून आपले कल्याण होते. हा या कथेतील भावार्थ आहे. तो जाणून जीवन जगण्याची कला शिकायची आहे. त्यासाठी बलिप्रतिपदेइतका उत्तम मुहूर्त अन्य कुठला असू शकतो ?
२ ऊ. भाऊबीज किंवा यमद्वितीया : दीर्घायुष्यासाठी तर यमाला जिंकायलाच पाहिजे; पण मनुष्य हा काही अमर नव्हे. एरव्ही ‘काळ’ वाटणारा हा यम, शरीर जर्जर झाल्यावर यावासा वाटू लागतो. मृत्यू हे मानवी शरिराचे अंतिम सत्य आहे आणि त्याचे भान राखले, तरच अंतरी नारायण धरता येतो. त्यासाठी यमाशी मैत्री साधण्याचा हा दिवस आहे. पाडव्याच्या निमित्ताने स्त्रिया नात्यातील विविध पुरुषांना, तर भाऊबीजेला भावाला औक्षण करतात. या सोहळ्यात एकमेकांना निरोगी दीर्घायुष्य चिंतले जाते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
३. दिवाळीचा फराळ शरिराचे बल वाढवणारा असणे
हे दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. चिवडा, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव, विविध लाडू, कडबोळी, शंकरपाळे अशा बहुविध चविष्ट पदार्थांनी संपन्न असा हा फराळ, म्हणजे ‘खाणार्यांची’ दिवाळीच. निसर्गात चालू झालेल्या थंडीला आणि त्यामुळे शरिरात प्रज्वलित होऊ लागलेल्या अग्नीला साजेसा हा गोड अन् तिखट फराळ पचायला जड असला, तरी शरिराला पोषक असतो. पावसाळ्यात भूक अल्प म्हणून केलेल्या उपवासांनी थोड्या कृश झालेल्या शरिराचे बल वाढवायला हे पदार्थ पुष्कळ उपयोगी पडतात.
एकूणच दिवाळीत ज्ञान, धन आणि बळ प्राप्त करण्याची मुहूर्तमेढ रचायची असते. या गोष्टी प्राप्त झाल्यावर त्यांचा विनियोग कसा करायचा, याचेही भान हवे. सुभाषितकार म्हणतात,
विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परिपीडनाय ।
खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ।।
अर्थ : दुष्ट लोक त्यांनी प्राप्त केलेली विद्या वाद घालण्यासाठी, धन उन्मादासाठी, तर शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी वापरतात. याउलट सज्जन माणसे त्यांनी प्राप्त केलेली विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी, तर शक्ती इतरांच्या रक्षणासाठी वापरतात.
४. उत्साही आणि आनंदी स्वरूप असलेली दिवाळी प्रतिदिन अनुभवायचा प्रयत्न करूया !
समस्त प्राणीमात्रांचा विचार करून निर्माण करण्यात आलेल्या या सणात प्रदूषणकारी आणि लहान लहान जिवांना मारक ठरणार्या फटाक्यांना कुठेतरी स्थान आहे का ? कुठेच नाही; कारण फटाके ही दिवाळी साजरी करायची एकमेव पद्धत नाही. त्यांना वगळून दिवाळी साजरी करण्याचे अनेक प्रशस्त मार्ग आपल्याच परंपरेत आहेत. दिवाळीचे हे उत्साही आणि आनंदी स्वरूप फारच मोहक आहे. प्रतिदिनच्या आयुष्यात हा आनंद आणि प्रसन्नता टिकवणे अजिबात अशक्य नाही. दिवाळीतील विशेष फराळ आणि वस्त्रालंकार सोडले, तरी पहाटे उठणे, अभ्यंग, उटणे, देवपूजा, जप आणि सर्व जिवांविषयी स्नेह हे उपचार केवळ दिवाळीपुरते नाहीतच मुळी. ते प्रतिदिन आचरणात आणून राजासारखे आयुष्य जगता येते. म्हणूनच म्हटले आहे, ‘राजाला दिवाळी काय ठाऊक ?’, म्हणजे राजासाठी प्रतिदिन हा दिवाळीसारखाच असतो.
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, २८ ऑक्टोबर २०१६)