साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘२२.१२.२००६ या दिवशी ‘माझ्याकडून चांगले प्रयत्न होत नाहीत’, असा विचार येऊन मला निराशा आली होती. याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच भाववृद्धी यांसाठी प्रयत्न होतात; पण यात तळमळ अल्प पडते का ? म्हणून माझी प्रगती होत नाही का ? इतर साधकांमधील चैतन्य वाढत आहे. मग मीच का मागे पडत आहे ? यासाठी वेगळे काही प्रयत्न करायला हवेत का ? माझे प्रयत्न चुकतात का ?’’
तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जे शक्य आहे, ते तळमळीने आणि परिपूर्ण केले, म्हणजे चैतन्य येणारच आहे. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला नकोत अन् ‘प्रगती होत आहे कि नाही ?’, हा निष्कर्ष लावत बसायला नको. जे आहे ते प्रामाणिकपणे करत रहायचे. आपोआपच ‘प्रगती होत आहे कि नाही ?’, हे तुमच्या लक्षात येईल किंवा कुणीतरी लक्षात आणून देईल.’’ त्यानंतर मात्र मी हा प्रश्न त्यांना पुन्हा विचारला नाही. दिलेली सेवा प्रामाणिकपणे होण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेला वरील दृष्टीकोन लक्षात राहिल्याने प्रयत्नांविषयी मला कधी निराशा आली नाही.’
– कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मे २०१६)