सहनशील, उत्तम स्मरणशक्ती असलेली आणि पुढाकार घेऊन सेवा करणारी कु. वैदेही राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. जवळीक करणे

‘वैदेही लहान असतांना मी (सौ. मीनल राजेंद्र शिंदे (आई)) तिला घेऊन सेवेनिमित्त ठाणे सेवाकेंद्रात जात होते. तेथील सर्व बालसाधकांशी ती खेळायची. तेव्हा तिची तेथील सर्व साधकांशी चांगलीच जवळीक झाली होती.

२. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

या काळात सद्गुरु राजेंद्र शिंदे (वैदेहीचे बाबा) प्रसाराची सेवा करायचे. ते रात्री सेवा करून घरी परत येईपर्यंत वैदेही जागी रहात असे. कधी कधी ती बाबांच्या समवेत रात्री नामजप करत असे. कधी तिचे बाबा तिच्याकडून सूक्ष्मातील प्रयोग करून घ्यायचे. अन्य विषयांवरील ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ यावर कापड ठेवून ते तिला विचारायचे, ‘‘यातील कुठल्या ग्रंथाची स्पंदने चांगली आहेत?’’, तेव्हा ती डोळे मिटून अचूकपणे सनातनच्या ग्रंथावर हात ठेवायची.

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

३. सहनशीलता

वर्ष २००० मध्ये अकस्मात् वैदेहीला गंभीर आजार झाला; पण लहान असूनही ती कधी घाबरली किंवा रडली नाही. आधुनिक वैद्य सांगतील, त्या सर्व पडताळण्या आम्ही करत होतो. प्रत्येक वेळी ती अगदी शांतपणे आणि स्थिर राहून आम्हाला अन् आधुनिक वैद्यांना सहकार्य करायची. कधी कधी आधुनिक वैद्य तिचे कौतुक करायचे आणि म्हणायचे, ‘‘असे गुणी बाळ आम्ही कधी पाहिले नाही.’’ तेव्हा ‘हिच्याकडे एवढी सहनशक्ती कुठून येते ?’, असे आम्हालाही वाटायचे. ती केवळ परात्पर गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा असल्याचे आम्ही अनुभवत होतो.

सौ. मीनल राजेंद्र शिंदे

४. उत्तम आकलनशक्ती

ती आजारी असतांना तिला शाळेत पाठवता येत नव्हते. मी तिच्या मैत्रिणींकडून शाळेच्या अभ्यासाच्या वह्या आणायचे. ती त्यातील सर्व अभ्यास स्वत:च्या वहीत लिहून काढायची अन् स्वतःच ते समजून घेऊन अभ्यास करायची. आम्ही कुणी तिला शिकवत नव्हतो. त्या वर्षी ती जवळपास वर्षभर शाळेत गेली नव्हती, तरीही ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. त्यातून तिची ‘स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती अफाट आहे’, हे आमच्या लक्षात आले.

५. सेवेची आवड

नंतर मी आणि वैदेही दीड वर्ष ठाणे सेवाकेंद्रात सेवा करत होतो. तेव्हा ती सगळ्या साधकांशी अगदी प्रेमाने बोलत असे. तिला तिथे सेवा करायलाही आवडत असे. ती तिला जमेल, तशी सेवा करायची, उदा. जुने साप्ताहिक क्रमाने लावणे, पाठकोरे कागद एकत्र करून ठेवणे इत्यादी.

६. वैदेहीचे बालपण सतत आजारपणात गेल्याने तिने लहानपणीच आधुनिक वैद्य होण्याचा निश्चय करणे

वैदेहीचे बालपण आधुनिक वैद्य, परिचारिका, रुग्णालय यांत गेल्यामुळे तिने ‘मोठेपणी आधुनिक वैद्य व्हायचे’, असे ठरवले. त्यासाठी ती त्या ध्येयानुसार प्रयत्न करायची आणि एकाग्रतेने अभ्यास करायची. ती आधुनिक वैद्यांची वेगवेगळ्या विषयांवरील चलचित्रे पहायची. ‘त्यांचे वागणे आणि बोलणे कसे आहे ?’, त्याचा ती अभ्यास करायची आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायची. त्यामुळे तिच्यात सेवाभाव वाढला होता. ती सतत इतरांना साहाय्य करण्यासाठी प्रयत्नरत रहायची. नंतर तिने वैद्यकीय शिक्षणामध्ये (मेडिकल सायन्स) ‘फिजिओथेरपिस्ट’चे २ वर्षांचे शिक्षण घेतले. आज ती देव आणि परात्पर गुरुदेव यांच्या कृपेने सनातनच्या आश्रमात वैद्यकीय सेवेसंदर्भातील सेवा करते. ही केवळ गुरुकृपाच आहे !

७. पुढाकार घेऊन सेवा करणे

७ अ. ‘न्यूरोथेरपी’चे शिबिर गोव्यात चालू झाल्यावर कु. वैदेही दायित्व घेऊन सेवा करू लागणे : गोव्यामध्ये ‘न्यूरोथेरपीचे’ शिबिर चालू झाले. त्या शिबिरामध्ये तिला अनुभवी आधुनिक वैद्यांकडून अनेक नवीन गोष्टी, वेगवेगळ्या रुग्णांच्या समस्या आणि त्यावरील वेगवेगळ्या उपचारपद्धती शिकता आल्या. शिबिर कधी वेगळ्या जिल्ह्यांत, उदा. सोलापूर किंवा गोव्यातील एखाद्या गावात होत असे. या शिबिरात तीव्र, मध्यम आणि मंद अशा आजारी रुग्णांची सूची बनवणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांची शिबिराच्या ठिकाणी ने-आण करणे, याचे पूर्ण दायित्व तिच्याकडे होते.

७ आ. शिबिरात ‘न्यूरोथेरपी’ शिकतांना कु. वैदेही आश्रमातही ‘न्यूरोथेरपी’चे उपचार करू लागणे आणि त्यातून तिच्यातील नेतृत्वगुण वाढणे : शिबिरात शिकतांना वैदेही आश्रमातील साधकांवरही दायित्व घेऊन ‘न्यूरोथेरपी’चे उपचार करू लागली. ही सेवा करतांना रुग्णांच्या समस्या, सेवा करणार्‍या साधकांच्या समस्या, इतर अडचणी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कौशल्याने नियोजन करू लागल्यामुळे तिच्यामध्ये नेतृत्वगुण वाढला.

७ इ. गोव्यात घर घेतांना कु. वैदेहीने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याशी बोलून दायित्वाने सर्व व्यवहार करणे : आमचे गोव्यात घर घ्यायचे ठरल्यावर वैदेही तिच्या सर्व सेवा झाल्यावर उरलेल्या वेळी साधक जिथे सांगतील, त्या ठिकाणी मला घरे पहायला नेत असे. घर बघतांना ती ‘कुठल्या साधकाला विचारल्यावर आपल्याला योग्य माहिती मिळेल ?’ या दृष्टीने अभ्यास करायची. त्यामुळे आमचा वेळ वाचत असे. आमचे एका ठिकाणचे घर घेण्याचे निश्चित झाल्यावर वैदेहीने त्याचे पूर्ण दायित्व पाहिले. ‘बांधकाम व्यावसायिकाशी (बिल्डर) कसे बोलायचे ? त्याला काय प्रश्न विचारल्यावर आपल्याला योग्य माहिती मिळेल ?’ याची सर्व माहिती ती तिच्या बाबांकडून (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून) जाणून घेत असे. त्यामुळे तिचे व्यावहारिक ज्ञानही वाढले.

७ ई. वैदेहीने सुखासन विक्रेत्याला योग्य मूल्यात सर्व साहित्य बनवून देण्याविषयी अतिशय नम्रतेने आणि शांतपणे सांगणे, त्यामुळे त्याने तसे करून देणे : घर घेऊन झाल्यावर वैदेहीने गोव्यातील स्थानिक साधकांकडून माहिती घेऊन ‘घरातील सर्व सामानाची रचना सात्त्विक कशी करावी ? सुखासनांची (‘फर्निचर’ची) रचना कशी असावी ? सुखासन विक्रेत्यांना त्यांच्या किमती विचारणे इत्यादी गोष्टी केल्या. सुखासन विक्रेत्यांना ती ‘आपल्या ‘बजेट’मध्ये कशी वस्तू बनवायची ?’ याविषयी अगदी नम्रतेने आणि शांतपणे समजावून सांगत असे. त्यामुळे एका सुखासन विक्रेत्याने आमच्या घरातील सगळेच ‘फर्निचर’ योग्य मूल्यात करून दिले.

त्याने सर्व योग्य मूल्यात केल्यामुळे आम्ही अनेक साधकांना त्याचा भ्रमणभाष क्रमांक दिला. त्यामुळे त्या व्यक्तीशी आमची चांगली ओळख झाली. आम्ही त्यांना सनातन संस्थेच्या कार्याविषयी सांगितल्यावर त्यांनी स्वतःचे घर आणि कार्यालय यांसाठी सनातनचे पंचांग, आकाश कंदिल आणि सात्त्विक उत्पादनेही घेतली.

७ उ. नियोजनकौशल्य : ती वस्तू खरेदी करतांना ‘अल्प मूल्यांत आणि टिकाऊ वस्तू कुठे मिळतील ?’, याचाही अभ्यास करते. तसेच घरात लागणारे अन्नधान्य, प्रतिदिन लागणार्‍या वस्तू याचे नियोजनही करते.

८. वैदेहीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे तिच्यामध्ये साधनेचे योग्य दृष्टीकोन निर्माण होणे

तिने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे साधनेतील संघर्ष अन् अडचणी यांवर ती मात करायला शिकली. ती माझ्या चुकाही तत्त्वनिष्ठपणे सांगते. त्यामुळे मला तिच्याकडून साधनेचे योग्य दृष्टीकोन मिळतात.

९. सदैव आनंदी असणार्‍या वैदेहीचे परात्पर डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक !

साधना करतांना काही वेळा तिच्या मनाचा संघर्षही होत असे; पण तिने हा संघर्ष कधीच तोंडवळ्यावर दिसू दिला नाही. ती नेहमी आनंदी असते. एकदा परात्पर गुरुदेव तिला म्हणाले होते, ‘‘तू नेहमीच एवढी आनंदी असतेस का गं ?’’ त्यावर ती केवळ स्मितहास्य करत उभी होती. तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘ज्यांच्याकडे आनंद असतो, तेच दुसर्‍यांना आनंद देऊ शकतात.’’

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (३०.११.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक