जिल्हाधिकार्‍यांनी विशाळगडावरील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत !

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने संबंधितांना विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या. या नोटिसांचा कालावधी वर्ष नोव्हेंबर २०२१ मध्ये संपल्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. गेल्या ९ मासांपासून पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. तरी विशाळगड येथील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याविषयी आपण प्रत्यक्ष लक्ष देऊन संबंधित अधिकार्‍यांना कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’च्या वतीने १७ ऑक्टोबर या दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर ‘पावसाळा असल्याने आपण थांबलो आहोत, लवकरच कारवाई करू’, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, ‘मराठा तितुका मिळवावा’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाडगे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, ‘कोल्हापूर हायकर्स असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. सागर पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. प्रमोद सावंत उपस्थित होते.