नाशिक – येथील अंबड परिसरात कधी धारधार शस्त्रे घेऊन मध्यरात्री धिंगाणा घातला जातो, तर कधी नागरिकांच्या घरांवर दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, तर कधी थेट वाहने जाळपोळ केल्याच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून ‘अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे उभारा’, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. याविषयी येथील माजी नगरसेवक राकेश दोंदे आणि परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे; मात्र वर्षानुवर्षे मागणी मान्य होत नसतांना गुन्हेगारांचा हैदोस काही केल्या अल्प होत नाही. त्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली नागरिक थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी मुंबईला पायी मोर्चा काढणार आहेत.
अंबड परिसर हा मोठा असल्याने पोलिसांचे मनुष्यबळही अल्प पडत असून गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत आहे. (नागरिकांचे रक्षण करणे, पोलिसांचे कर्तव्य असतांना त्यासाठी नागरिकांना मोर्चा काढावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकावाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अपयशी ठरणे, हे चिंताजनक आहे. असे असेल, तर गुन्हेगारी कधीतरी अल्प होईल का ? यासाठी पोलिसांनी अभ्यास करून युद्धपातळीवर स्वतःहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे. |