‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून घराजवळ आरोग्य सुविधा देण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात ७०० दवाखाने उभारणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – राज्याची ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आरोग्यक्षेत्रासाठी दुप्पट निधी देण्यात येईल. राज्यात ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चालू करण्यात येणार आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत आरोग्ययंत्रणेचे जाळे सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. मुंबईत २२७ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चालू करण्यात येणार आहेत. त्यांपैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून चालू झाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालये यांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. याद्वारे ग्रामीण भागांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यात येणार आहे. राज्यात ‘कॅथलॅब’ (हृदयाच्या रक्तवाहिन्या किंवा हृदयाच्या कक्षांना दृश्यमान करण्यासाठी वापरला जाणारा तपासणी कक्ष) ही यंत्रणाही चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.’’