निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६७
१. ‘सायंकाळी वेळ झाल्यावर चहा-फराळाची इच्छा होणे’हे खोट्या भुकेचे लक्षण
‘सायंकाळच्या चहा-फराळाची आरोग्याच्या दृष्टीने खरोखर काही आवश्यकता नसते. प्रतिदिन शेव, चिवडा इत्यादी तळलेले पदार्थ खाऊन आपण हृदयविकाराची शक्यता वाढवत असतो. नेहमी सायंकाळी चहा-फराळ करायची सवय झाली की, ती सवय मोडता येत नाही. वेळ झाली की, शरिराला आवश्यकता नसली, तरी भूक लागते आणि इथेच आपण फसतो. ‘ही खोटी भूक आहे’, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
२. ४ वेळा खाण्याची सवय मोडून २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावण्यासाठी चहा-फराळ सोडणे आवश्यक
शरीर ही ईश्वराने बनवलेली एक अद्भुत यंत्रणा आहे. आपण शरिराला जी सवय लावू, ती लागते. दिवसातून ४ वेळा खाण्याची सवय लावली, तर शरीर दिवसातून ४ वेळा खायला मागेल. २ वेळाच खाण्याची सवय लावली, तर २ वेळाच मागेल; परंतु ४ वेळा खाण्याची सवय असल्यास ती मोडणे कठीण जाते. अशा वेळी आरंभी सायंकाळचा चहा-फराळ सोडावा, म्हणजे ४ पेक्षा ३ वेळा आहार होईल.
३. ‘चहा-फराळ सोडतांना शरिराला पित्ताचा त्रास होऊ नये’, यासाठी पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !
सायंकाळचा चहा-फराळ सोडण्यासाठी मनाचा निश्चय करावा. आपल्याकडून होणार्या चुकांसाठी प्रायश्चित्त म्हणूनही सायंकाळचा चहा-फराळ सोडता येईल. नेहमीच्या सवयीनुसार सायंकाळच्या फराळाची वेळ झाली की, भूक लागेल. त्या वेळी शारीरिक सेवा कराव्यात, म्हणजे भुकेचे विचार निघून जातील. तरीही भूक लागली, तर थोडे पाणी प्यावे. याने भूक शमते. असे करूनही काही जणांची भूक शमत नाही. पोटामध्ये जठराच्या हालचाली जाणवतात आणि पुष्कळ भूक लागते. अशा वेळी चहाचे १ – २ चमचे (५ ते १० मिलि) तूप चघळून खावे आणि शक्य असल्यास वर थोडे गरम पाणी प्यावे. निवळ तूप खाणे कठीण जात असेल, तर तुपामध्ये थोडी साखर किंवा गूळ घालावा. तूप प्यायल्याने पोटामधील भगभग (आग) शमते. तुपावर गरम पाणी प्यायल्याने तूप पचायला साहाय्य होते. यासाठी स्वतःकडे तुपाची बरणी बाळगा आणि अवेळी पुष्कळ भूक लागून पोटात जठराच्या हालचाली जाणवतील, तेव्हा चमचाभर तूप खा !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२२)