गोंधळाची परंपरा !

नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली. महाराष्ट्रामध्ये गोंधळाची मोठी परंपरा आहे. मुख्यत्वे श्री तुळजाभवानी आणि श्री रेणुकामाता या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या संदर्भातही गोंधळ घालण्याची प्रथा चालू झाली.

गोंधळ

१. ‘संबळ गोंधळ’ आणि ‘काकड गोंधळ’

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आलेल्या व्यक्तीला ‘गोंधळी’ म्हणतात. देवीचे गुणगान करणार्‍या व्यक्तीलाही ‘गोंधळी’ म्हणतात. अंबामातेचा जयजयकार करत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींची गाणी सादर करते. संबळाच्या तालावर केलेल्या नृत्याला ‘संबळ गोंधळ’, असे म्हणतात. काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. त्याला ‘काकड गोंधळ’, असे म्हटले जाते.

देवीचा गोंधळ घालतांनाचे संग्रहित छायाचित्र

२. घरातील शुभकार्याच्या प्रसंगी देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा असणे

आजही जवळजवळ सर्व समाजात कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. शुभकार्याच्या वेळी गोंधळी निरनिराळ्या देवतांना गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. जिथे गोंधळ घालावयाचा आहे, तिथे पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते किंवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडतात. त्यावर उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव सिद्ध केला जातो आणि त्याला फुलांच्या माळा बांधल्या जातात. याला ‘गोंधळाचा चौक’ असे म्हणतात. दिवटे पेटवतात आणि ते हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत अन् नृत्य सादर करतात. हे ऐकतांना विशेष आनंद होतो.

तुळजापूरची भवानीआई गोंधळाला यावं ।
कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं ।
गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावं ।।

कुलदेवी, ग्रामदेवी, आराध्यदेवता अशा सर्व देवतांना गोंधळाला येण्याचे आवाहन केल्यानंतर देवीचे स्तवन करण्याची पदे म्हटली जातात. त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो.

अनादि निर्गुण प्रकटली भवानी ।
मोह महिषासुरमर्दना लागुनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्ता लागोनि पावसि निर्वाणी ।
आईचा जोगवा जोगवा मागेन ।। – संत एकनाथ महाराज

अर्थ : संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जिला आदि (प्रारंभ) नाही, अशी निर्गुण भवानीमाता प्रकटली आहे. ती मोहरूपी महिषासुराचे मर्दन करणार असून मनुष्याचे त्रिविध ताप दूर करणार आहे. ती भक्तांवर प्रसन्न झाली आहे. अशा या आईचा मी जोगवा मागेन. (म्हणजे तिच्या कृपेची याचना करीन.)’’

गोंधळ्याकडे विविध वाद्ये असतात. त्यापैकी संबळ हे अधिक महत्त्वाचे वाद्य असून त्याच्या समवेत तुणतुणे आणि टाळ वाजवतात. पूर्वीसारखा वेष परिधान करणारे अत्यंत अल्पच गोंधळी शेष राहिले आहेत. आता काळानुसार त्यांचाही वेषही पालटला आहे.’

(साभार : मासिक ‘श्रीमत् पूर्णानंदाय नम:’, दिवाळी विशेषांक २०१३)


‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/614564.html