पुणे येथे डेक्कन महाविद्यालय संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या वतीने ‘खुला दिवस’ साजरा !

डॉ. सुमित्र कत्रे या भाषातज्ञांच्या नेतृत्वाखाली ‘संस्कृत विश्वकोशा’चा हा प्रकल्प साकारत आहे !

पुणे – संस्कृतमधील शब्दांचा सिद्ध होणारा आगळावेगळा विश्वकोष नागरिकांना पहाता यावा, संस्कृत साहित्यातील ज्ञानठेवा सर्वांपुढे येऊन त्याचा प्रचार-प्रसार होण्याच्या उद्देशाने ‘डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थे’च्या ‘संस्कृत आणि कोशशास्त्र’ विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर या दिवशी ‘खुला दिवस’ साजरा करण्यात आला.

ऋग्वेदापासून ते १९ व्या शतकातील ग्रंथांपर्यंत जवळजवळ १ सहस्र ५०० संस्कृत ग्रंथांमधून १ कोटी संदर्भांचे संकलन करून सिद्ध केलेले स्क्रिप्टोरिअम पहाण्यास उपलब्ध होते.

वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्दांचे आणि त्यांच्या संदर्भांचे संकलन केले असून त्याची रचना अन् त्यांचे अर्थ ऐतिहासिक क्रमाने दिले जातात, हे या विश्वकोशाचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत या कोशाच्या ३५ खंडांचे प्रकाशन झाले असून ३६ वा खंड लवकरच प्रकाशित होत आहे. डॉ. सुमित्र कत्रे या भाषातज्ञांच्या नेतृत्वाखाली ‘संस्कृत विश्वकोशा’चा हा प्रकल्प साकारत आहे.