मुंबई – सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हा दृष्टीकोन होता. सत्यशोधक समाजाने ईश्वर नाकारला नाही. ईश्वर अवतार घेत नाही. पुनर्जन्म आणि मोक्ष नसतो. या कल्पना आहेत, हे सत्यशोधक समाजाने सांगितले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याविषयी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवात ते बोलत होते.
बुद्धाप्रमाणेच फुले यांनी दांभिक धर्मव्यवस्थेला आव्हान देत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला- शरद पवार #MahatmaPhule #SharadPawar https://t.co/2jip1KtN0I
— LoksattaLive (@LoksattaLive) September 27, 2022
या वेळी व्यासपिठावर माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, भरत पाटणकर, प्रा. हरि नरके, आ.ह. साळुंखे आदी पुरोगामी मंडळी उपस्थित होती. या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘ईश्वर एकच आहे. तो निर्विकार आहे. त्यामुळे त्याच्या उपासनेसाठी मध्यस्थांची आवश्यकता नाही, ही सत्यशोधक समाजाची भूमिका आहे. पेशवाईच्या उत्तरकाळात जातीयभेदाने परिसीमा गाठली. हिंदु धर्माची अनीती पाहून सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. सत्यशोधक समाजाला केवळ धार्मिक सुधारणा नव्हे, तर शैक्षणिक सुधारणा अपेक्षित होते.’’ (हिंदु धर्माचा काडीमात्र अभ्यास नसतांना त्यामध्ये नाक खुपसणारी ही मंडळी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांतील अघोरी प्रथांविषयी कधी सत्य शोधण्याचा प्रयत्न का करत नाहीत ? – संपादक)
(म्हणे) ‘जिला आम्ही कधी पाहिले नाही आणि जिने कधी आम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची ?’ – आमदार छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस
‘अल्ला आणि येशू ख्रिस्त यांची उपासना करू नका’, असे म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?
शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांची चित्रे लावा; मात्र शाळेत सरस्वतीदेवीचे चित्र लावले जाते. जिला आम्ही कधी पाहिले नाही, जिने कधी आम्हाला शिकवले नाही. शिकवले असेल, तर ३ टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर केले. आम्हाला ज्यांनी दूर केले, त्यांची पूजा कशाला करायची ? ज्यांच्यामुळे शिक्षण मिळाले, ते तुमचे देव असायला हवेत. त्यांची पूजा करा; परंतु त्यांचे छायाचित्रेही तुमच्या घरात आढळणार नाहीत. देव समजून त्यांची पूजा झाली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. अन्य देवांचे नंतर पाहू. (हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तत्त्व असलेल्या देवतांची आराधना केली जाते. ज्याप्रमाणे बुद्धीची देवता श्री गणेश आहे, त्याप्रमाणे सरस्वती ही विद्येची देवता आहे. सरस्वतीदेवीच्या उपासनेमुळे विद्या प्राप्त होते. भुजबळ यांच्या बोलण्यातून त्यांना हिंदु धर्माविषयी काडीमात्र ज्ञान नाही, हेच दिसून येते. ज्या विषयाचे ज्ञान नाही, त्यावर बोलल्यास स्वत:चे अज्ञान प्रकट होते, याचेही ज्ञान नसलेले नेते समाजाला काय दिशादर्शन करणार ? – संपादक)
कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार श्री सरस्वतीदेवीचे चित्र हटवणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मुंबई – श्री सरस्वती ही विद्येची देवता आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सरस्वतीदेवीला मान आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्यांना हिंदुत्व मान्य नाही, अशी व्यक्तीच श्री सरस्वतीदेवीचे चित्र हटवण्याची भाषा करू शकते. छगन भुजबळ असे बोलले असतील, तर हे चुकीचे आहे. शाळांमध्ये महापुरुषांची चित्रे अवश्य लावा; परंतु त्यासाठी श्री सरस्वतीदेवीचे चित्र का हटवावे ? आमचे सरकार कोणत्याही परिस्थिती श्री सरस्वतीदेवीचे चित्र हटवणार नाही, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.
देशाला खिळखिळे करण्याचा ‘पी.एफ्.आय.’चा प्रयत्न !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अटकेविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मागील ५ वर्षे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि आतंकवादविरोधी पथक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कारवायांवर लक्ष ठेवून होते. वेगवेगळ्या माध्यमांतून समाजात भेद निर्माण करून देशाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न पी.एफ्.आय. करत होती. त्यामुळे या संघटनेवर कारवाई करणे आवश्यक होते.’’
संपादकीय भूमिका
|