#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
प्रस्तुत लेखात ‘नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान इत्यादींचा समावेश आहे. २३ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण नारायणबलीविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
३. नागबली
३ अ. उद्देश : घराण्यात पूर्वी कोणत्याही पूर्वजाकडून नागाची हत्या झाली असल्यास त्या नागाला गती न मिळाल्यामुळे तो कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो, तसेच अन्य प्रकारे वंशजांना त्रास देतो. या दोषाच्या निवारणासाठी हा विधी करतात.
३ आ. विधी : संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास त्या दांपत्याने स्वतः हा विधी करावा. श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक लाभ होतो.’
४. त्रिपिंडी श्राद्ध
४ अ. व्याख्या : तीर्थाच्या ठिकाणी पितरांना उद्देशून जे श्राद्ध करतात, त्याला त्रिपिंडी श्राद्ध असे म्हणतात.
४ आ. उद्देश : आपल्याला ठाऊक नसलेल्या, आपल्याच वंशातील सद्गती न मिळालेल्या किंवा दुर्गतीला गेलेल्या आणि कुळातील लोकांना पीडा देणार्या पितरांना, त्यांचे प्रेतत्व दूर होऊन सद्गती मिळण्यासाठी, म्हणजेच भूमी, अंतरिक्ष आणि आकाश या ३ ठिकाणी असलेल्या आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी, त्रिपिंडी करण्याची पद्धत आहे. एरव्ही केली जाणारी श्राद्धे ही एकाला उद्देशून किंवा वसु-रुद्र-आदित्य या श्राद्धदेवतांच्या पितृगणांतील पिता-पितामह-प्रपितामह या त्रयींना उद्देशून म्हणजेच ३ पिढ्यांपुरतीच मर्यादित असतात; पण त्रिपिंडी श्राद्धाने त्यापूर्वीच्या पिढ्यांतील पितरांनाही तृप्ती मिळते. प्रत्येक कुटुंबात हा विधी दर १२ वर्षांनी करावा, मात्र ज्या कुटुंबात पितृदोष अथवा पितरांमुळे होणारे त्रास असतात, त्यांनी हा विधी दोष निवारणासाठी करावा.
४ इ. विधी
४ इ १. विधी करण्यास योग्य काल
अ. त्रिपिंडी श्राद्धासाठी अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, अमावास्या, पौर्णिमा या तिथी आणि पूर्ण पितृपक्ष योग्य असतो.
आ. गुरु शुक्रास्त, गणेशोत्सव आणि शारदीय नवरात्र या कालावधीत हा विधी करू नये, तसेच कुटुंबात मंगलकार्य झाल्यावर वा अशुभ घटना घडल्यावर एक वर्षापर्यंत त्रिपिंडी श्राद्ध करू नये. अगदीच अपरिहार्य असेल, उदा. एक मंगलकार्य झाल्यावर पुन्हा काही मासांच्या अंतराने दुसरे मंगलकार्य होणार असेल, तर त्या दोन कार्यांच्या मध्यंतरी त्रिपिंडी श्राद्ध करावे.
४ इ २. विधी करण्यास योग्य स्थाने : त्र्यंबकेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, गरुडेश्वर, हरिहरेश्वर (दक्षिण काशी), काशी (वाराणसी) ही स्थाने त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.
४ इ ३. पद्धत : ‘प्रथम तीर्थात स्नान करून श्राद्धाचा संकल्प करावा. नंतर महाविष्णु आणि श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण यांची श्राद्धविधीप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर यव, व्रीही आणि तीळ यांच्या पिठाचा प्रत्येकी एकेक पिंड तयार करावा. दर्भ पसरून त्यावर तिलोदक शिंपडून पिंडदान करावे.
अ. यवपिंड (धर्मपिंड) : पितृवंशातील आणि मातृवंशातील ज्या मृतांची उत्तरक्रिया झाली नाही, संतती नसल्याने ज्यांचे पिंडदान केले गेले नाही किंवा जन्मतःच जे आंधळे-पांगळे होते (आंधळे-पांगळे असल्याने लग्न न झाल्याने संततीरहित), अशा पितरांचे प्रेतत्व नष्ट होऊन त्यांना सद्गती मिळण्यासाठी यवपिंड देतात. याला ‘धर्मपिंड’ असे नाव आहे.
आ. मधुरत्रययुक्त व्रीहीपिंड : पिंडावर साखर, मध आणि तूप एकत्र मिसळून घालतात, त्याला मधुरत्रय असे नाव आहे. हा दिल्याने अंतरिक्षात असलेल्या पितरांना सद्गती मिळते.
इ. तीलपिंड : पृथ्वीवर क्षुद्रयोनीत राहून इतरांना पीडा देणार्या पितरांना तीलपिंडाने सद्गती प्राप्त होते.
या तिन्ही पिंडांवर तिलोदक द्यावे. त्यानंतर पिंडांची पूजा करून अर्घ्य द्यावे. श्रीविष्णूसाठी तर्पण करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांना दक्षिणा म्हणून वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तू द्याव्यात.’
४ ई. पितृदोष असल्यास आई-वडील जिवंत असतांनाही मुलाने विधी करणे योग्य असणे : श्राद्धकर्त्याच्या पत्रिकेत पितृदोष असेल, तर तो दोष घालवण्याच्या उद्देशाने त्याने आई-वडील जिवंत असतांनाही हा विधी करावा.
४ उ. विधीच्या वेळेस केस काढण्याची आवश्यकता : श्राद्धकर्त्याचे वडील जिवंत नसतील, तर त्याने विधी करतांना केस काढावेत. वडील जिवंत असणार्या श्राद्धकर्त्याने केस काढण्याची आवश्यकता नाही.
४ ऊ. घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना घरातील इतरांनी पूजा वगैरे करणे योग्य असणे : त्रिपिंडी श्राद्धात श्राद्धकर्त्यालाच अशौच असते, घरातील इतरांना नाही. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना इतरांनी पूजा वगैरे करणे बंद करण्याची आवश्यकता नाही.
(समाप्त)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)’
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English