पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती सेवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा !

कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु जनजागृती समिती सेवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुणे येथील कार्यशाळेत ७०, कोल्हापूर येथे ८०, तर सोलापूर येथील कार्यशाळेत ८० हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

सामायिक मार्गदर्शन

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये आध्यात्मिक नेतृत्व निर्माण होणे महत्त्वाचे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात जो दायित्व घेऊन सेवा करतो त्याला सेवक म्हणतात. समितीचे कार्य करतांना दायित्व घेऊन कार्य करणे अपेक्षित आहे ! याचसमवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये आध्यात्मिक नेतृत्व निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे ! त्यादृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजात गेल्यानंतर प्रसार करण्यासाठी उपयुक्त असे नेतृत्व घेणे, समन्वय करणे, पुढाकार घेणे, समाजाला योग्य दिशा देणे अशा गुणांचा विकास होण्यास साहाय्य होणार आहे, असे मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी विशेष मान्यवर म्हणून उपस्थित असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

कार्यशाळेतील काही विषय आणि प्रायोगिक भाग !

या कार्यशाळेत नियोजन क्षमतेचा विकास, गुणसंवर्धन, आदर्श संपर्क कसा करावा ?, माहिती अधिकाराचा वापर कसा करावा ?, उपक्रमांची वृत्ते कशी करावीत ? यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन आणि प्रायोगिक भाग घेण्यात आले. ‘साधनेच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व आणि लाभ’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आंदोलन करण्यामागील उद्देश, प्रकार, स्थानिक आणि विशेष आंदोलन, धर्मकार्यात माहिती अधिकारी कायदा -२००५ चा प्रभावी वापर कसा करावा ?, नियोजन कसे करावे ? हिंदु राष्ट्रासंदर्भात आक्षेप आणि खंडन, हिंदु जनजागृती समितीचे विविध उपक्रम यांविषयीची नीती, कार्यपद्धती आणि दिशा यांसह अन्य महत्त्वांच्या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

पुणे येथील कार्यशाळेतील काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत –

१. श्री. विनायक रोडगे – मला पडत असलेल्या अनेक प्रश्नांचे शंकानिरसन या कार्यशाळेच्या माध्यमातून झाले. माझ्यात अनेक दोष आहेत, त्याचे निवारण कसे करायचे ? याचे मार्गदर्शन मिळाले. याचा उपयोग साधनेत, सेवेत करता येईल असा प्रयत्न करेन.

२. श्री. मनोहरलाल उणेचा – या कार्यशाळेत येऊन मला पुष्कळ चैतन्य मिळाले. कार्यशाळेला येण्यापूर्वी माझ्या वडिलांना बरे नव्हते. त्यांना रुग्णालयात न्यावे लागणार होते; पण देवाच्या कृपेने ते बरे झाले आणि मला कार्यशाळेला येण्याची संधी मिळाली.

३. अधिवक्ता मृणाल साखरे – कार्यशाळेत शिकायला मिळालेली सूत्रांनुसार कृती करून क्षमता वाढवण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण सेवा करण्यासाठी प्रयत्न करेन.
४. श्री. अनिल साळुंके आणि सौ. कीर्ती साळुंके – आमच्या लहान मुलीला  कार्यशाळेच्या आदल्या दिवशी अचानक रुग्णालयात न्यावे लागले. आम्हाला कार्यशाळेला येण्याची पुष्कळ इच्छा होती. देवाला पुष्कळ प्रार्थनाही झाल्या. देवाच्या कृपेने दुसर्‍या दिवशी मुलगी बरी झाली आणि आम्हाला दोघांनाही कार्यशाळेला उपस्थित रहाता आले.

कार्यशाळेला येण्याआधी अनेक जणांना पुष्कळ अडचणी आल्या. त्यावर आध्यात्मिक उपाय आणि सद्गुरु यांच्या मार्गदर्शनामुळे त्या अडचणी सुटून सर्वांना कार्यशाळेला उपस्थित रहाता आले.

कोल्हापूर येथील कार्यशाळा

नवे-पारगाव येथील कार्यशाळेसाठी पू. (डॉ.) श्रीमती शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती.

सोलापूर येथील कार्यशाळा

सोलापूर येथील कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. राजन बुणगे (डावीकडे) आणि सद्गुरु स्वाती खाडये (उजवीकडे)

सोलापूर येथील टाकळीकर मंगल कार्यालय झालेल्या कार्यशाळेत सोलापूर, लातूर, बीड, पुणे, धाराशिव, सातारा येथील ८० हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अन् धर्मप्रेमी सहभागी होते. या प्रसंगी सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती.

सोलापूर येथील कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे (डावीकडे) आणि सद्गुरु स्वाती खाडये (उजवीकडे)

मेरू पर्वताप्रमाणे आम्हा सर्वांसाठी आधार असलेले रमेशदादा ! – सतीश कुंचपोर, सोलापूर

श्री. रमेश शिंदे

र- रणमर्द, रणझुंजार, रणरणत्या, सळसळत्या हिंदूंच्या रक्तामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे, असे आमचे रमेशदादा.
मे – मेरू पर्वताप्रमाणे आम्हा सेवकांसाठी आधार बनलेले, असे आमचे रमेशदादा.
श – शत्प्रतिशत् गुरुदेवांसाठी जगणे, गुरुदेवांचे शब्द न् शब्द समितीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचावा, यासाठी तळमळणारे, असे आमचे रमेशदादा.

शिं – गुरुदेवरुपी शिंपल्यातील मोती प्रमाणे तेजस्वी, सर्व हिंदूंचे मुकुटमणी, खरे हिंदु जननायक पदाला शोभतील, असे आमचे रमेश दादा.
दे – गुरुदेवांनी जेजे त्यांना दिले ते ते सर्व पालकत्व घेऊन आम्हा जिवांना देणारे, निव्वळ प्रीती असणारे, असे आमचे रमेशदादा.

हा अर्थ गुरुदेवांच्या कृपेमुळेच उमगला. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता – श्री. सतीश कुंचपोर, सोलापूर

मनोगत

१. श्री. संजय इंगळे, बार्शी – आस्थापनांमध्ये काम करतांना केवळ ‘नेतृत्व विकास कसा करावा ?’ याचा लेख वाचून त्याप्रमाणे शिका’, असे वरिष्ठ सांगतात; मात्र कार्यशाळेत ‘नेतृत्व विकास कसा करावा ?’ हे बारकाव्यांसह, तसेच उदाहरणे देऊन हाताला धरून शिकवले. त्यामुळे त्याचे योग्य प्रकारे आकलन झाले.

२. श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर – समाजामध्ये हिंदु राष्ट्राचे महत्त्व कसे पटवून द्यायचे ? हे शिकता आले. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

सोलापूर येथील कार्यशाळेत स्वागतासाठी लावण्यात आलेला वैशिष्ट्यपूर्ण फलक

सामायिक क्षणचित्रे

१. कार्यशाळेत फलक, तसेच ‘प्रोजेक्टर’ यांचा वापर करून माहिती दाखवण्यात आल्यामुळे ती कार्यकर्त्यांना समजणे सोपे झाले.
२. या वेळी सहभागी समितीसेवकांनी कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शंकांचे निरसन करून घेतले, तसेच स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करून प्रभावीपणे धर्मकार्य करण्याचा निश्चय केला.
३. पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथील काही युवा कार्यकर्त्यांनी वृत्तलेखन, माहिती अधिकाराचे आवेदन सिद्ध करणे यांच्या प्रायोगिक भागात चांगला सहभाग नोंदवला.