रुग्णांच्या आरोग्य सेवेसमवेत स्वच्छतेला महत्त्व द्या !

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

तानाजी सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली

सोलापूर, ७ सप्टेंबर (वार्ता.) – रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्त्व द्या. कागदपत्रांत न अडकता रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी नातेपुते येथे केले. मंत्री सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली. या वेळी आमदार राम सातपुते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून स्वच्छतेसाठी दोन व्यक्ती नेमण्याचे निर्देश श्री. सावंत यांनी दिले. त्या कर्मचार्‍यांना वाढवून पैसे द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येतात. त्यांना कुठे काय आहे ? याची माहिती समजण्यासाठी समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचनाफलक लावावेत.