पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – अवघड अभ्यासक्रमासमवेतच सामाजिक माध्यमांत आपली हुशारी दाखवण्याची भूरळ पडल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती होत आहे, तर ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’ यांवर सक्रीय असलेल्या विद्यार्थिनी लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या काळात विद्यार्थ्यांच्या भावनिकतेशी संबंधित समस्यांसंबंधी समूपदेशन करण्यात आले आणि या वेळी ही माहिती उघडकीस आली, असे समूपदेशक डॉ. रूपेश पाटकर यांनी सांगितले. दैनिक ‘गोवन वार्ता’ यांनी हे वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तात समूपदेशक डॉ. रूपेश पाटकर यांनी सांगितलेली पुढील महत्त्वाची सूत्रे आहेत.
१. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या सामाजिक माध्यमांत मुली पुष्कळ सक्रीय असतात. या ठिकाणी ‘जोड्या जुळवणे’ असे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. याच प्रकारातून पुढे लैंगिक शोषण होते. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या बहुतांश मुलींचे मूळ कारण सामाजिक माध्यमात सक्रीय असणे, हेच आहे.
२. विविध प्रकारे स्वत:ला सादर करण्याचे आकर्षण कोवळ्या वयातील मुलामुलींना असते. यातूनच ‘स्वत:चे कौतुक केले जावे’, अशी अपेक्षाही वाढत जाते. यातून नकळत कुणीतरी आवडायला लागते आणि याला प्रेम समजून विद्यार्थी भावनेच्या आहारी जातात.
३. सामाजिक माध्यमांत मैत्रीचा प्रस्ताव देणे आणि त्यातून जवळीक वाढण्याचे प्रमाण अधिक असते. यातून लैंगिक आकर्षण वाढते आणि विद्यार्थिनी शोषणाला बळी पडतात. काही प्रमाणात मुलेही अशा शोषणाला बळी पडलेले आहेत.
४. भ्रमणभाष, ‘टीव्ही’, ‘इंटरनेट’ आदींमुळे विद्यार्थ्यांना मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि ‘व्हिडिओ’ यांमधून सर्व प्रकारच्या आशयांची दालने खुली झालेली आहेत. काय योग्य आणि काय अयोग्य ? याची समज नसल्याने विद्यार्थी वहावतच जात आहेत.
५. अभ्यासातील अधोगतीचे कारण हे नेहमी आकलनाची क्षमता न्यून असणे असे नसते, तर त्यामागची कारणे ही निरनिराळी असू शकतात. एका विद्यार्थिनीचे वडीलच तिचे लैंगिक शोषण करत होते. (असे होणे ही समाजातील नैतिकतेची अधोगतीच ! – संपादक)
६. कुटुंबातील वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या भावनिक पातळीवर पुष्कळ परिणाम होत असतो. आई-वडिलांची भांडणे, आर्थिक चणचण, घरच्यांचा दबाव आदींमुळे घरी सतत तणावपूर्ण वातावरण असल्यास मुले मनाने कमकुवत बनतात आणि ती मनाने पुष्कळ हळवी बनतात.
७. राज्यातील किनारी भागांतील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. इयत्ता १० वीमध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी सिगारेट सुटत नसल्याची समस्या घेऊन आली होती. या भागात या वयातच काही विद्यार्थ्यांना तंबाखूचेही व्यसन जडले आहे.
संपादकीय भूमिका
|