वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक संशोधन : सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

देवतेचे चित्र जेवढे तिच्या मूळ रूपाशी मिळते-जुळते असेल, तेवढी त्या चित्रात त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात !

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

गणेशोत्सव २०२२

‘उपासना करतांना उपासकाला आनंद, शांती यांची अनुभूती येण्यासाठी त्याचा उपास्य देवतेप्रती भाव जागृत होणे महत्त्वाचे असते. उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी काढलेली श्री गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, श्री दत्त, शिव, श्री लक्ष्मी आणि श्री दुर्गा या देवतांची चित्रे सनातन संस्थेने प्रकाशित केली आहेत. या चित्रांमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व आले आहे. वर्ष २००० ते २०१८ या कालावधीत देवतांच्या चित्रांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार सांगितलेले पालट करण्यात आले. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १५.१०.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत वर्ष २००० ते २०१८ या कालावधीतील सनातन-निर्मित श्री गणपतीच्या एकूण ७ चित्रांच्या पुढील बाजूने (सगुण) आणि मागील बाजूने (निर्गुण) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – लेखात श्री गणपतीच्या चित्राच्या पुढील बाजूस ‘सगुण’ आणि मागील बाजूस ‘निर्गुण’, असे संबोधले आहे.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. चाचणीतील सनातन-निर्मित श्री गणपतीच्या सातही चित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे आणि वर्ष २०१८ मधील चित्रात ती सर्वाधिक असणे : चाचणीतील सनातन-निर्मित श्री गणपतीच्या सातही चित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या सर्वच चित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे आणि वर्ष २०१८ मधील चित्राच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक आहे.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या सातही चित्रांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असून ती उत्तरोत्तर अधिक आहे.

२. वर्ष २०१८ मधील सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्राच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक आहे.

३. श्री गणपतीच्या चित्राच्या सगुण बाजूपेक्षा त्याच्या निर्गुण बाजूच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक आहे.

३. मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र साधक-कलाकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेली असणे : स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. चित्रातील देवतेचा आकार, तिचे अवयव, तिच्या अंगावरील अलंकार, तिची शस्त्रे इत्यादी घटक देवतेच्या प्रत्यक्षातील त्या त्या घटकांशी किती प्रमाणात जुळतात, यावरून त्या चित्राची एकूण सत्यता ठरते. प्रत्येक देवतेचे चित्र काढून झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या चित्राची सात्त्विकता सूक्ष्मातून जाणून ती टक्क्यांमध्ये सांगितली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-कलाकारांना काळानुसार केलेल्या मार्गदर्शनाचे फलित म्हणजे श्री गणपतीच्या चित्रातील सात्त्विकतेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या चित्रांच्या चाचण्यांतूनही हे दिसून आले.

३ आ. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या वर्ष २०१८ मधील चित्रात सर्वाधिक (३१ टक्के) सात्त्विकता असणे : या कलियुगात सर्वसामान्य मनुष्याने निर्माण केलेल्या देवतेच्या एखाद्या कलाकृतीत, म्हणजे चित्र किंवा मूर्ती यामध्ये अधिकाधिक ३० टक्के सात्त्विकता, म्हणजे सत्यता येऊ शकते. वर्ष २०१८ मधील श्री गणपतीच्या चित्रामध्ये त्याहून अधिक (३१ टक्के) सात्त्विकता येणे, हा सनातनच्या साधक-कलाकारांच्या उच्चतम भावावस्थेचा परिणाम आहे.

३ इ. ‘सगुणा’पेक्षा ‘निर्गुण’ अधिक प्रभावी असल्याने श्री गणपतीच्या चित्राच्या पुढील (सगुण) बाजूपेक्षा त्याच्या मागील (निर्गुण) बाजूच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असणे : देवतेच्या सगुण रूपापेक्षा तिचे निर्गुण रूप सूक्ष्म असल्याने त्यातून अधिक चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्राच्या पुढील (सगुण) बाजूपेक्षा मागील (निर्गुण) बाजूच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ ई. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. वर्ष २००० मधील चित्राच्या तुलनेत वर्ष २००१ मधील चित्रामध्ये देवाचे अवयव, त्याच्या मुकुटादी अलंकारांची नक्षी, त्याच्या वस्त्रांचा रंग, फुलांचा हार, पाट इत्यादी मध्ये सुधारणा केल्यावर त्या चित्राच्या सात्त्विकतेत २ टक्के वाढ होऊन ती ६ टक्के झाली.

२. वर्ष २००२ मधील चित्रात देवाच्या अवयवांचा आकार, देवाच्या मागील पार्श्वभूमीचा रंग, गळ्यातील फुलांचा हार, पाट यांमध्ये पालट केल्यावर, तसेच देवाच्या चरणाखाली सात्त्विक रांगोळी काढल्यावर चित्राच्या सात्त्विकतेत वाढ होऊन ती १० टक्के झाली.

३. वर्ष २००३ मधील चित्रात देवाच्या अवयवांचा आकार, देवाच्या मागील पार्श्वभूमीचा रंग, देवाच्या वस्त्रांचा रंग आणि पाटाखालील रंग यांमध्ये पालट केल्यावर चित्राच्या सात्त्विकतेत वाढ होऊन ती १५ टक्के झाली. हे चित्र आधीच्या तिन्ही चित्रांच्या तुलनेत अधिक सात्त्विक असल्याचे सहज लक्षात येते.

४. आधीच्या वर्षांतील चित्रांच्या तुलनेत वर्ष २००७ मधील चित्रात देवाच्या मुखावरील भाव अधिक प्रमाणात पालटल्याचे जाणवते. हे साधक-कलाकारांची साधना आणि सेवा भावाच्या स्तरावर आरंभ झाल्याचे द्योतक आहे.

५. वर्ष २०१३ मधील चित्राकडे पाहिल्यावर ‘साक्षात् श्री गणपतीचे दर्शन घेत आहोत’, असे जाणवून भावजागृती होते.

६. वर्ष २०१८ मधील गणपतीच्या चित्राकडे पाहिल्यावर मनाला शांतीची स्पंदने जाणवतात.

थोडक्यात, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पंदनशास्त्रानुसार आणि काळानुसार साधक-कलाकारांना केलेल्या मार्गदर्शनामुळे देवतेच्या चित्रामध्ये उत्तरोत्तर अधिक सात्त्विकता निर्माण झाली. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती देतात. ही सेवा करतांना साधक-कलाकारांमध्ये ईश्वराप्रती भाव निर्माण झाला. यातून ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच साधनेचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१२.२०१९)
ई-मेल : [email protected]