आस्थापनांनी ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेणे बंद न केल्यास ‘मनसे’च्या पद्धतीने उत्तर देणार !

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. यशवंत किल्लेदार (मध्यभागी), श्री. अभय मुणगेकर (डावीकडे) आणि श्री. सिद्धांत मोहिते

मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) – ‘हलाल’ अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. देशातील सर्वांत मोठी ‘टेरर फंडिंग’ यंत्रणा, तसेच जागतिक पातळीवर ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसेने ‘नो टू हलाल’ची मोहीम हाती घेतली आहे, अशी घोषणा येथील महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांनी २७ ऑगस्ट या दिवशी मनसेच्या ‘राजगड’ पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ‘या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन त्यांनी केले. ‘आमचा विरोध ‘हलाल’ला नाही; पण ‘झटका’ मांसही विकले पाहिजे. विविध आस्थापनांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेऊन स्वतःच्या उत्पादकांची विक्री करू नये, असे पत्र आम्ही संबंधित आस्थापनांना देऊ. त्यांनी न ऐकल्यास या आस्थापनांना मनसे पद्धतीने (‘स्टाईल’ने) उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे उपाध्यक्ष श्री. सिद्धांत मोहिते आणि सल्लागार श्री. अभय मुणगेकर उपस्थित होते.

श्री. यशवंत किल्लेदार म्हणाले की,

१. ‘हलाल’ म्हणजे इस्लामी पद्धतीने प्राण्यांची कत्तल करण्याची पद्धत असून अत्यंत क्रूरतेने प्राण्यांची हत्या करण्यात येते. त्याउलट हिंदु, शीख आणि ख्रिस्ती धर्मीय हे ‘झटका’ पद्धतीचे मांस खातात; परंतु कालांतराने मांस व्यवसायात ‘हलाल’ची मक्तेदारी वाढून झटका मांस आणि त्याचे विक्रेते खाटीक अन् वाल्मीकि समाज यांना वेगळे करण्यात आले.

२. हे सूत्र केवळ धार्मिक आहे, असे नाही. १५ टक्के मुसलमान धर्मियांसाठी ‘हलाल’ पद्धत असली, तरी देशातील इतर धर्मियांनी हे का मानायचे ? अरब देशात ‘हलाल’ केलेल्या मांसाची मागणी आहे; मात्र येथे ‘हलाल’समवेत ‘झटका’ मांसाचीही विक्री करावी.

३. खाटिक यांचा पारंपरिक व्यवसाय त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला आहे. पर्यायी इतर सर्व धर्मियांना ‘हलाल’ पद्धतीचे मांस घ्यावे लागते. ‘हलाल’ ही इस्लामी संकल्पना देशातील ८५ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. देशात शासनाने ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न आणि औषध प्रशासन (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत.

४. हिंदु, शीख, ख्रिस्ती धर्मीय झटका पद्धतीचे मांस खातात. मूळ मांसासाठी असणारे ‘हलाल’ प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि आयुर्वेदिक औषधे रुग्णालये यांच्यासह ‘मॅकडोनाल्ड आणि के.एफ.सी’ या आस्थापनांनी घेतले आहे. इस्लामी अर्थव्यवस्था भारतात उभी केली जात आहे. ‘हलाल’ ही पद्धत मुसलमानांना पाहिजे, तर त्यांनी ठेवावी; पण इतरांवर लादू नये.

५. ‘हलाल’ची मक्तेदारी तोडून या षड्यंत्रात सामील असणार्‍या सर्वांना शासन करून खाटीक आणि वाल्मीकि समाजास त्यांची रोजीरोटी पुन्हा मिळवून देणे अन् सुरक्षित करणे, हे मनसेच्या मोहिमेमागील मुख्य उद्दिष्ट आहे.

६. मॉल्स, दुकाने नागरिक, विविध संघटना, व्यापारी, उद्योजक, तसेच समाजातील प्रत्येक घटकांमध्ये ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात जागृती करण्याची आवश्यक आहे. हा सर्व पैसा थेट आतंकवाद्यांच्या कार्यवाहीसाठी वापरला जात असेल, तर या यंत्रणेवर महाराष्ट्रातील हिंदूंनी ‘नो टू हलाल’ हाती घेणे आणि ‘एक चळवळ’ सिद्ध होणे आवश्यक आहे. या चळवळीत सर्वांनी भाग घ्यावा.

‘हलाल’च्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार !

पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना श्री. यशवंत किल्लेदार म्हणाले, ‘‘हलाल’च्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. कर्नाटकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ज्या पद्धतीने ‘हलाल’च्या विरोधात आंदोलन करून ‘झटका’ मटणांची दुकाने चालू केली, त्याप्रमाणे येथेही आंदोलन करण्यात येईल; मात्र यामध्ये जनतेचा प्रतिसादही महत्त्वाचा आहे. जनतेचा प्रतिसाद मिळाल्यास पुढील टप्प्यांची आंदोलने केली जातील. येत्या काळात व्यापार्‍यांच्या संघटनांसमवेत बैठका आणि परिषद घेऊन त्यांनाही हे सूत्र स्पष्ट करणार आहे. ‘हलाल’च्या विरोधात आम्ही पत्रक छापून हा विषय संबधित आस्थापनांच्या लक्षात आणून दिला जाईल.’’

पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली !

‘हलाल’च्या विरोधातील मोहीम सर्वप्रथम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशात राबवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पूर्ण भारतभ्रमण करून ‘हलाल’च्या विरोधात व्याख्याने, परिषदा आणि बैठका घेतल्या आहेत, तसेच ‘हलाल’ पद्धतीच्या विरोधात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, देहली येथे आंदोलने करण्यात आली आहेत. आज मनसेची पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वी ‘हलाल’ची माहिती होण्यासाठी सर्व पत्रकारांना श्री. रमेश शिंदे यांची ‘हलाल’च्या संदर्भातील मार्गदर्शन करणारी ध्वनीचित्रचकती १० मिनिटे दाखवण्यात आली.