काश्मीरविषयी पाककडून करण्यात येणारा प्रचार मोडून काढावा !

श्रीनगरस्थित पत्रकार आणि काश्मिरी कार्यकर्ते बशीर अहमद यांचे स्थलांतरित काश्मिरींना आवाहन !

पाकिस्तानचा काश्मीरविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध अपप्रचार

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तान हा काश्मीरविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध अपप्रचार करत आहे. काश्मीर खोर्‍यासंदर्भात खोट्या विधानांचा अंत करण्याची वेळ आली आहे. पाकचा हा प्रचार मोडून काढावा. पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. खोर्‍यातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी तो इस्लामी खिलाफतची कल्पना पसरवत आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या जुन्या ठरावांचा वापर केला जात आहे, असे विधान श्रीनगर येथील पत्रकार आणि काश्मिरी कार्यकर्ते बशीर अहमद यांनी येथे एका कार्यक्रमात केले. या वेळी त्यांनी येथील काश्मिरी स्थलांतरितांना पाकिस्तानकडून करण्यात येणारा अपप्रचार थांबवण्याचे आवाहनही केले. बशीर यांच्या ‘कश्मीर : द वॉर ऑफ नरेटिव्हज – अ‍ॅन इनसाइडर्स पर्स्पेक्टिव्ह’ या नूतन पुस्तकावर चर्चा करण्यासाठी ‘साऊथ सेंट्रल एशिया अ‍ॅकॅडमिक फोरम’ने (‘एससीएएएफ’ने) कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या मानवी अधिकारांच्या उल्लंघनाचा निषेध करण्यात आला. काश्मिरी राष्ट्रवादी मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत आणि राजकारणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

१. उपस्थित वक्त्यांनी या वेळी म्हटले की, व्यवस्थेच्या विरोधात निषेध करण्याचा अधिकार हा मूलभूत मानवी अधिकार आहे आणि तो दडपला किंवा काढून घेतला जाऊ शकत नाही. अन्याय, महागाई, विजेचा तुटवडा आणि प्रचंड कर यांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना बंदुकीच्या जोरावर शांत करता येऊ शकत नाही.

२. या कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील सैनिकी अन् प्रभावशाली लोक यांच्याकडून भूमी बळकावल्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. वर्ष १९४७ पासून या प्रांतातील जनता ही पाकिस्तानी आक्रमणे, हिंसाचार आणि आतंकवादी यांना बळी पडत आहे. हे आता थांबले पाहिजे, असेही कार्यक्रमात सांगण्यात आले.