कोल्हापूर, २८ जुलै (वार्ता.) – हुपरी-कोल्हापूर रस्त्यावर उचगाव येथील पूल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथे २ दिवसांपूर्वी खड्ड्यांत पडून १२ अपघात झाले आहेत. असे छोटे-मोठे अपघात प्रतिदिन येथे होत आहेत. या भागातून हुपरी, पट्टणकोडोली, गडमुडशिंगी, तसेच कर्नाटक येथे जाण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने वाहतूक चालू असते. तरी हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांना देण्यात आले. या वेळी अभियंता पाटील म्हणाले,‘‘कोल्हापूर-हुपरी राज्यमार्ग या रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरणासाठी संमती मिळाली आहे. काम चालू होईपर्यंत जेथे खड्डे पडले आहेत, तेथे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून ते खड्डे बुजवून घेऊ, तसेच गटारांची स्वच्छता करू.’’ या प्रसंगी सर्वश्री अवधूत साळोखे, पोपट दांगट, दीपक पाटील, कैलास जाधव, भूषण चौगुले, नितीन गानबोटे, अजित चव्हाण, संतोष चौगुले, प्रफुल्ल घोरपडे, वीरेंद्र भोपळे यांसह अन्य उपस्थित होते.
संपादकीय भूमिकानिवेदन दिल्यावर कर्तव्य बजावणारा सार्वजनिक बांधकाम विभाग काय कामाचा ? |