कोलगाव येथील शासकीय गोदामाची इमारत ३ वर्षे धूळ खात पडून

कोलगाव येथील शासकीय गोदाम

सावंतवाडी – तालुक्यातील कोलगाव येथील शासकीय गोदामाची इमारत ३ वर्षे धूळ खात पडली आहे. याची नोंद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आणि पदाधिकारी  यांनी गोदाम आणि परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली. १५ ऑगस्टपूर्वी ही इमारत वापरात न आणल्यास आंदोलन करण्याची  चेतावणी दळवी यांनी या वेळी दिली. (अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असतांना ही इमारत धूळ खात पडून असल्याचे दिसले नाही का ? इमारत धूळ खात पडून रहाणे चुकीचेच आहे; पण त्याला राष्ट्रवादीही तेवढीच उत्तरदायी असून सध्या दिलेली आंदोलनाची चेतावणी हे राजकारणच नव्हे का ? – संपादक)

नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधीतून कोलगाव येथे १ सहस्र ८०० मेट्रिक टन क्षमतेच्या शासकीय गोदामाची इमारत उभारण्यात आली. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गेली ३ वर्षे ही इमारत धूळ खात पडली असून येथे पायाभूत सुविधाही नाहीत. (गेली अडीच वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने या सुविधा का उपलब्ध केल्या नाहीत ? – संपादक) त्यामुळे ही इमारत आता अवैध व्यवसायांचा अड्डा बनत आहे. (याला तत्कालीन सरकारच उत्तरदायी नाही का ? – संपादक) या गोदामाच्या ठिकाणी जाण्याचा मार्गही अरूंद आहे. या मार्गावर असलेला पूलही नाजूक स्थितीत आहे. त्यामुळे अवजड वाहने गेल्यास हा पूल कोसळण्याची शक्यता आहे. अशा अनेक असुविधा आहेत. याविषयी बांधकाम विभाग आणि पुरवठा विभाग एकमेकांवर दायित्व ढकलत आहेत. त्यामुळे ही भूमी निवडणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करण्यात येईल, असे दळवी यांनी सांगितले.

संपादकीय भुमिका

गेली अडीच वर्षे सत्तेत असूनही गोदामाच्या कार्यवाहीसाठी काही न करणारी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे १५ ऑगस्टपूर्वी कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार !