अप्रसन्न लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत असल्याचा दावा
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी अजून संपर्क केला नसला, तरी ते अधून-मधून माझ्या संपर्कात असतात. अप्रसन्न लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत आहे, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केले.
या वेळी ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘विरोधी पक्षनेता ठरवायला आणखी थोडा वेळ घेतला, तर काय अडचण आहे. भुजबळांसह अनेकांविषयी मला वाईट वाटले. भाजपच्या काळात राज्यघटना आणि लोकशाही यांचे धिंडवडे निघत आहेत. लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. ‘वन नेशन वन इलेक्शन’ अर्थात् ‘एक देश एक निवडणूक’ हे होता कामा नये. निवडणूक आयुक्त हेही निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. देशातील महत्त्वाच्या विषयांवरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा जनतेची दिशाभूल करण्यासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा विषय आणला जात आहे.’’