शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

पुणे – ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लिहितांना छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला’, हे शरद पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचे नसून निंदनीय आहे; कारण याआधी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केल्याचे ‘व्हिडिओ’ आमच्याकडे आहेत. शरद पवार यांनी इतिहासाचा अभ्यास नसतांना केवळ जातीचे राजकारण करत पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांचा विषय सक्रीय करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी पुरंदरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. शरद पवार यांनी त्यांच्या वक्तव्याविषयी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे श्री. आनंद दवे यांनी केली आहे.

शरद पवार यांनी विख्यात शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत:च्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचे जातीयद्वेषी वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर दवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद दवे पुढे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासाने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय झाला, असे पवारांना वाटत असेल, तर त्यांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा. शरद पवार हे इतिहासकार नाहीत.