महाबळेश्वर (सातारा) येथील ‘ब्लूमिंग डेल हायस्कूल’च्या वरच्या बाजूचा डोंगर खचला !

शाळेमधील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे महसूल विभागाचे आदेश

डोंगराला २ फुटांच्या भेगा पडून डोंगर मोठ्या प्रमाणात खचला आहे

सातारा, २३ जुलै (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील ‘ब्लूमिंग डेल हायस्कूल’च्या वरच्या बाजूच्या डोंगराला २ फुटांच्या भेगा पडून डोंगर मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून विद्यार्थ्यांचे दुसरीकडे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असून याचा परिणाम दांडेघर भागातील डोंगरभागावर होत आहे. घाटातील दरडी कोसळण्याचे प्रकार चालू असून भूमी खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शाळेजवळची दरड कोसळून ती पाण्याच्या टाकीजवळ आली आहे, तर भूमी खचल्यामुळे जवळच असलेला विजेचा खांब कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.