ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१६.७.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १६.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.        

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  https://sanatanprabhat.org/marathi/596882.html

पू. राजाराम नरुटे

८. अनोळखी व्यक्तींशीही जवळीक साधणे, सर्वांशी आदराने बोलणे आणि बालपणीच्या मित्रांशी मैत्री शेवटपर्यंत टिकून रहाणे

श्री. शंकर नरुटे

बसमधून प्रवास करतांना किंवा कोणत्याही कार्यक्रमात पू. आबा अनोळखी व्यक्तीची स्वतःहून ओळख करून घेतात. समाजातील व्यक्ती पू. आबांना नमस्कार करतात. समाजातील मोठ्या व्यक्तीही पू. आबांना ‘आबा’, ‘महाराज’ किंवा ‘राजारामबुवा’, असे आदराने संबोधतात. पू. आबा सर्वांशी आदराने बोलत असल्याने सर्व जण त्यांच्याशी आदरानेच बोलतात. पू. आबांची बालपणीच्या मित्रांशी मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. खरेतर पू. आबा ९० वर्षांचे आहेत. त्यांच्या वयाचे आता कुणी हयात नाही; पण त्यांच्या मित्रांची मुले अजूनही पू. आबांची आठवण काढतात.

९. पाळीव प्राण्यांवर प्रेम करणे

घरी शेळी, म्हैस, मांजर इत्यादी प्राणी आहेत. पू. आबा दिसले नाहीत की, ते प्राणी ओरडतात अन् पू. आबा दिसले की, शांत होतात. पू. आबा त्या प्राण्यांच्या पाठीवरून हात फिरवतात, तसेच त्यांना प्रेम देतात. त्यामुळे ते प्राणीही तेवढ्याच प्रेमाने त्यांच्या जवळ येतात. एखादा प्राणी आजारी झाल्यास पू. आबा उपाय करून त्याला बरेही करतात.

१०. साधनेचे खडतर प्रयत्न जिद्दीने करणे

ईश्वरपूर येथील संभोआप्पा मठात कार्तिक पौर्णिमा या दिवशी यात्रा असते. या यात्रेच्या १५ दिवसांच्या कालावधीत पू. आबा ‘वळू’ (देवाच्या दरबारात सेवा करणे) म्हणून मठात थांबून तिकडच्या सेवा करायचे. ते त्या कालावधीत घरीही येत नसत. ते साधनेचे असे खडतर प्रयत्न जिद्दीने करत असत.

११. संपर्कातील व्यक्तींना अध्यात्माविषयी सांगणे

अ. पू. आबांना कुणीही भेटले, तरी ते त्यांना अध्यात्माविषयी सांगतात. ते भेटलेल्या व्यक्तींना ‘अध्यात्मातील विविध गोष्टी सांगून ‘आपला हिंदु धर्म किती श्रेष्ठ आहे !’, हे पटवून देतात.

आ. ‘पू. आबा ९० वर्षांचे आहेत, तरीही ते प्रत्येक गोष्ट तळमळीने आणि आंतरिक भावाने समोरच्या व्यक्तीला सांगतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्या आत्मसात् होतात, तसेच त्यांच्या मनातही जातात’, असेही जाणवते.

१२. गावातील लोक माझ्याजवळ पू. आबांविषयी कौतुकाने बोलतात.

१३. ‘स्वतःच्या अडचणी परमेश्वर सोडवणार आहे’, असा भाव असणे आणि इतरांच्या अडचणी ऐकून त्यांना मार्गदर्शन करणे

‘पू. आबांना कितीही अडचणी आल्या, तरीही ते इतरांना कधीच सांगत नाहीत. ‘स्वतःला आलेल्या अडचणी परमेश्वर सोडवणार आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे ते स्वतःच्या अडचणींचा विचार कधीच करत नाहीत. ते देवाच्या अनुसंधानात रहातात आणि इतरांच्या अडचणींचा विचार करून त्यांना मार्गदर्शन करतात.

१४. कष्टाची कामे करणे

घरची स्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पुष्कळ कष्टाची कामे करावी लागली; पण त्यांच्या तोंडवळ्यावर कष्ट केल्यामुळे ताण किंवा थकवा कधीच दिसत नसे. तेव्हाही ते आनंद अनुभवायचे. ते ट्रकमधील वाळू उतरवणे, ट्रकमध्ये वाळू भरणे इत्यादी कामे करायचे. ते ‘इतरांच्या शेतातील कामे करणे, शेताची देखभाल करणे’, असे सर्व करत असल्यामुळे शेतमालकाला त्याकडे लक्ष द्यावे लागत नसे. त्यामुळे त्यांनाही पू. आबांचा आधार वाटायचा. ‘शेतात पीक कोणते आणि कसे लावायचे ? त्याची काळजी कशी घ्यायची ? उत्पन्न कसे काढायचे ?’, हे सर्व निर्णय शेतमालक पू. आबांना विचारूनच घेत असत. शेतमालकाने त्यांच्याकडे कधी नोकर म्हणून पाहिले नाही. ते पू. आबांना घरातीलच एका सदस्याप्रमाणे वागणूक द्यायचे.

१५. साधनेने एका व्यक्तीवरील करणी नष्ट करणे

पू. आबा नामजपादी उपाय करून काही जणांना मार्गदर्शनही करत असतात. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘करणीमधील ‘मूठ मारणे’ हा प्रकार माझ्या लक्षात आल्यावर मी ती करणी हवेतून जात असतांना थांबवली आणि साधनेच्या साहाय्याने नष्ट केली. तिच्यामुळे पुढे एका व्यक्तीची मोठी हानी होणार होती. तसे व्हायला नको; म्हणून मी ती करणी नष्ट केली. करणी उलटवता येते. करणी उलटवली, तर ती ज्यांनी केली होती, त्याला त्रास होऊ शकतो. दोघांनाही त्रास व्हायला नको; म्हणून मी करणीचा त्रास मध्येच संपवला.’’

१६. इस्लामपूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे

ईश्वरपूर येथील ‘इस्लामपूर अर्बन बँक’ या अधिकोषाच्या इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ प.पू. भक्तराज महाराज यांच्या हस्ते झाला होता. त्या वेळी पू. आबा त्या अधिकोषाचे सदस्य म्हणून तेथे उपस्थित होते. तेव्हा त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले. प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. रवींद्र बोरकर हे त्या अधिकोषाचे उपाध्यक्ष होते. तेही पू. आबांचे चांगले मित्र होते.

१७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची झालेली प्रथम भेट !

१७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. आबा यांची दैवी भेट होणे अन् त्या वेळी ‘भक्त गुरूंना आणि गुरु भक्ताला अनेक जन्मांनंतर भेटत आहे’, असे वाटणे : पू. आबांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी ते दोघे बोलत असतांना मला वाटत होते, ‘भक्त गुरूंना आणि गुरु भक्ताला अनेक जन्मांनंतर भेटत आहेत. भगवंताच्या मागील अवतारी कार्यानंतर कलियुगातील या अवतारी कार्यात एकमेकांची परत भेट घडून आली आहे.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. आबा यांना पुष्कळ आनंद झाला होता. त्या दोघांमध्ये फार पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे आनंदात संवाद चालू होता. त्या वेळी मला संत तुकाराम महाराज यांचा ‘सापडलो एकामेकां ।’, हा अभंग आठवला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नियोजित वेळेनुसार भगवंताचे कार्य होत असते आणि ते पुढेही जात असते. हे भगवंताचे नियोजन असते आणि त्या नियोजनानुसार प्रत्येक गोष्ट जुळून येते अन् तसे घडते. त्याचा कार्यकारणभाव भगवंत आपल्यासमोर योग्य वेळ आल्यावर प्रगट करतो.’

१७ आ. पू. आबांचे संतत्व प्रकट करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आतुर असणे आणि ती त्यांची उच्च कोटीची अवस्था असल्याचे जाणवणे : पू. आबांचे संतत्व प्रकट करण्याच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला होता. त्यांनी ‘आपण त्यांचा सत्कार लवकर करूया’, असा निरोप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना देणे’, असा निरोप पाठवला. यातून लक्षात येते, ‘भक्ताचे संतत्व प्रकट करण्याची वेळ आल्यावर भगवंत सर्वांना आनंद देण्यासाठी आतुरलेला असतो. भगवंताची आतुरलेली स्थिती, म्हणजे त्याची उच्च कोटीची अवस्था असते.’

१७ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी भेटीच्या वेळी पू. आबा आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी काढलेले उद्गार !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘तुझ्या बाबांच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवते. त्यांच्या बोलण्यातही चैतन्य आहे. त्यांचे शब्द जरी वेगळे असले, तरी ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. त्यांच्या बोलण्यात सहजता आहे. त्यांचा एकेक शब्द महत्त्वाचा आहे. ते एकेक विचार देवाशी जोडतात. हे ते कुठे शिकले ? त्यांच्या जीवनावर एक ग्रंथ होईल.’’

२. परात्पर गुरु डॉक्टर कुटुंबियांना म्हणाले, ‘‘तुम्ही वडिलांची सेवा करता. यातूनच तुमची साधना होणार आहे. शंकरची आध्यात्मिक प्रगती लवकर का होत आहे ?’, हे आता मला समजले.’’

३. परात्पर गुरु डॉक्टर पू. आबांना म्हणाले, ‘‘तुमच्यामुळे त्याची (श्री. शंकर नरुटे यांची) आध्यात्मिक प्रगती लवकर होत आहे.’’

– श्री. शंकर नरुटे (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२२)

(क्रमशः) 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक