सतत इतरांचा विचार करणारे ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१६.७.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेला त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.            

(भाग १)

पू. राजाराम भाऊ नरुटे यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. घरातील वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासूनच अध्यात्माची आवड असणे

अ. ‘पू. आबांना (पू. राजाराम नरुटे यांना) लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आहे. आमच्या घरात धार्मिक वातावरण आहे. पू. आबांचे आई-वडील ((कै.) भाऊ मरगु नरुटे आणि (कै.) श्रीमती अनुबाई भाऊ नरुटे) साधना करणारे होते. त्यांनी पू. आबांवर देवा-धर्माचे संस्कार केले.

आ. त्यांच्या जन्मानंतरच्या १२ व्या दिवशी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. त्यामुळे ते आधी वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. त्यांचे पंढरपूरची वारी करणे आणि भजन-कीर्तनाला जाणे, असे चालू होते. त्यानंतर काही वर्षांनी ते ‘कलंकी केशव संप्रदाया’नुसार साधना करू लागले. त्या संप्रदायानुसार भगवंताच्या १० व्या अवताराचे कार्य ते सर्वांना सांगत असतात.

​इ. त्यांचे शिक्षण झालेले नाही. त्यांना लिहायला किंवा वाचायलाही येत नाही. त्यांनी प्रवचने, कीर्तने आणि पुराणातील गोष्टी ऐकल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी मुखोद्गत आहेत. ते नेहमी त्या गोष्टी सांगत असतात.

ई. पू. आबा धर्माचरणी आहेत. ते शिखा ठेवतात आणि जानवे घालतात. आमच्या घरासमोर पू. आबांचे ‘कुलकर्णी’ नावाचे मित्र रहात होते. पू. आबांनी त्यांच्याकडून काही विधी शिकून घेतले. पू. आबा तुळशीचा विवाह लावणे, यांसारखे विधी करायचे. त्या वेळी लोकांनी त्यांना दिलेली दक्षिणा ते पुरोहितांना, म्हणजेच आमच्यासमोर रहाणाऱ्या कुलकर्णी कुटुंबियांना द्यायचे. पू. आबा सांगायचे, ‘‘हा त्यांचा मान आहे.’’

उ. घरी धार्मिक कार्यक्रम किंवा देवाधर्माचे अधिक करत असल्यामुळे सात्त्विक वातावरण आहे. आमच्या घरात एखाद्या मंदिराप्रमाणे शांतता असते. आमचे घर पांढऱ्या मातीचे आहे, तरी घरात शांत झोप लागते.

ऊ. आमच्या घरी पूर्वीपासून मांसाहार केलेला चालत नाही. बाहेरील कुणीही मांसाहार करून घरी येऊ शकत नाही. पू. आबांनी सांगितले, ‘‘एखादा चुकून मांसाहार करून घरी आलाच, तर त्याला त्रास होतो. तो त्वरित घराबाहेर जातो. असे काही प्रसंग पूर्वी झाले आहेत.’’

२. स्वतः शेती आणि अन्य व्यवसाय करून लहान भावाला शिक्षण देणे

पू. आबांनी स्वतःच्या लहान भावाच्या ((कै.) रामकृष्ण नरुटे यांच्या), म्हणजे माझ्या काकांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांनी स्वतः शेती आणि अन्य व्यवसाय करून माझ्या काकांना शिक्षण दिले. माझ्या काकांना शिक्षण घेतांना काही अडचणी आणि त्रास सोसावे लागले. पू. आबांनी त्यांच्या भावाला ‘माघार न घेता अडचणींवर कशी मात करायची ? कितीही संघर्ष झाला, तरी त्या संघर्षावर मात करून विजय कसा मिळवायचा ?’, यासंदर्भात मार्गदर्शन केले. काकांना चांगली नोकरी लागली. काका पू. आबांशी आदराने वागत असत. पू. आबांनी त्यांना शेवटपर्यंत आधार दिला.

३. पू. आबा नातेवाइकांचा आधारस्तंभ असणे आणि त्यांनी पू. आबांनी सांगितल्यानुसार श्रद्धेने कृती करणे

श्री. शंकर नरुटे

भावंडांना कष्ट करायला लागू नयेत; म्हणून पू. आबांनी स्वतः कष्ट केले. त्यांनी सर्व भावंडांवर (श्रीमती शकुंतला रामचंद्र जाधव (वय ८८ वर्षे), श्रीमती कमल तुकाराम कदम (वय ८६ वर्षे) आणि (कै.) रामकृष्ण नरुटे यांच्यावर) चांगले संस्कार केले. ते सर्व भावंडांशी प्रेमाने बोलतात आणि वागतात. सर्व जण त्यांची अडचण पू. आबांना सहजतेने सांगतात.

पू. आबा नातेवाइकांचा आधारस्तंभ आहेत. पू. आबांना भेटल्यावर नातेवाइकांना समाधान वाटते. त्यांच्या बोलण्यातील प्रेमभावामुळे नातेवाइकांना आनंद होतो. नातेवाईक किंवा समाजातील व्यक्ती पू. आबांनी सांगितलेल्या सूत्रांचे काटेकोर पालन करतात. तसे केल्याने त्यांना चांगली प्रचीती येते. सर्वांच्या मनात पू. आबांप्रती श्रद्धा निर्माण झाली आहे.

४. मुलांना देवतांची नावे ठेवणे

आमच्या घरी धार्मिक वातावरण असल्यामुळे प्रत्येक गोष्ट अध्यात्माला धरून केली जायची. माझ्या मोठ्या बहिणीचा (सौ. शोभा विठ्ठल थोरात हिचा) जन्म गोकुळाष्टमीला झाला; म्हणून तिचे नाव ‘गोकुळा’, असे ठेवले. माझा जन्म श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी झाला; म्हणून माझे नाव ‘शंकर’ ठेवले.

५. आई-वडिलांनी देवाला नवस केल्यावर मुलाचा (श्री. शंकर यांचा) जन्म होणे

आई-बाबांना ((कै.) सौ. शालन नरुटे,  आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि पू. राजाराम नरुटे यांना) मुलगा नव्हता. त्यांनी देवाला नवस केला. त्यानंतर अध्यात्मातील जाणकारांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला मुलगा होईल.’’ माझ्या बहिणीच्या जन्मानंतर ७ वर्षांनंतर माझा जन्म झाला. त्यामुळे ‘माझा जन्म अन्य गोष्टींसाठी नसून भगवंताच्या कार्यासाठी आहे’, हे सनातनमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आले.

६. मुलांवर चांगले संस्कार करणे

अ. पू. आबांनी आम्हा सर्व भावंडांवर (सौ. शोभा विठ्ठल थोरात, सौ. मंगल शंकर काजारे आणि श्री. शंकर राजाराम नरुटे यांच्यावर) लहानपणापासून चांगले संस्कार केले. ते आम्हाला प्रत्येक सूत्र शांतपणे सांगून आमच्याकडून कृती करवून घेत असत. ते आमच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी वेळप्रसंगी थोडेफार रागवायचेही; पण त्यांचा राग काही क्षणांतच न्यून होऊन त्यांचे वागणे नेहमीसारखे होत असे.

आ. ‘मी साधनेत पुढे जावे’, यासाठी ते मला समर्थ रामदासस्वामी यांच्यासारख्या संतांची उदाहरणे देऊन ‘त्यांच्यासारखे कठोर प्रयत्न करायला हवेत’, असे सांगतात.

७. प्रेमभाव

अ. पूर्वीपासून पू. आबांचे सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि वागणे असल्यामुळे गावातील सर्वांशी त्यांची जवळीक आहे. ते सर्वांशी सहजतेने बोलतात. त्यांचे कुणाशी भांडण झाले नाही, तसेच कुणाशी वैर निर्माण झाले नाही. ते सतत इतरांसाठी झटतात. ते ‘इतरांना आनंद कसा देता येईल ?’, अशा प्रकारे कृती करतात.

आ. ते प्रतिदिन सकाळी झाडांवरची फुले काढून देवांना वहातात. ते शेजारी रहाणाऱ्या व्यक्तींनाही देवपूजेसाठी फुले देतात.

ई. एखादा चांगला पदार्थ असल्यास ते तो इतरांना आवर्जून देतात. त्यांचा उपवास असतांना त्यांच्यासाठी बनवलेली साबुदाण्याची खिचडी ते घरातील लहान मुलांना आणि मला देतात अन् स्वतः थोडीशीच घेतात. त्यांना स्वतः खाण्यापेक्षा इतरांना देण्यात पुष्कळ आनंद होतो. त्यानेच त्यांचे पोट भरते.

– श्री. शंकर नरुटे (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२२)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/597517.html