मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला द्यावयाच्या आरक्षणाविषयी सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीमुळे राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै या दिवशी राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायत यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणावर सर्वाेच्च न्यायालयात १९ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. यावरील निर्णय होईपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. निवडणूक स्थगित झाल्याने निवडणुकीच्या क्षेत्रात लागू केलेली आचारसंहिताही निवडणूक आयोगाकडून रहित करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नगर परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार !
मुंबई – महाविकास आघाडीमध्ये असूनही नगर परिषदेच्या निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ जुलै या दिवशी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सत्ताकाळात शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत पोचली, असे आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला स्वत: उपस्थित रहाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.