‘हॅम्लेट’, ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ आणि ‘पर्स्युएशन’ कादंबरी वाचल्याने विद्यार्थ्यांत येतात आत्महत्येचे विचार !

ब्रिटनच्या ओपन युनिव्हर्सिटीच्या एका समितीचा अभ्यास

वॉशिंग्टन (अमेरिका) – विल्यम शेक्सपिअरची ‘हॅम्लेट’, जोनाथन स्विफ्टची ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ आणि जेन ऑस्टेनची ‘पर्स्युएशन’ या कादंबर्‍यांचे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वैफल्य, आत्महत्येचे विचार, वंशवाद आणि हिंसाचारी प्रवृत्ती निर्माण होते, असा दावा ब्रिटनच्या ओपन युनिव्हर्सिटीच्या एका समितीने अभ्यासाअंती केला.

या तिन्ही कादंबर्‍यांतील ३० प्रकरणांत प्रचंड नकारात्मक उदाहरणांचा समावेश आहे. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या विचारांवर पडू शकतो. या विश्‍वविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकतात. समितीच्या अभ्यासानंतर या तिन्ही कादंबर्‍यांच्या पहिल्या पानावर याविषयी चेतावणी प्रकाशित केली आहे. लवकरच या तिन्ही कादंबर्‍यांवर बंदीही घातली जाऊ शकते. विद्यार्थ्यांनीच यासंदर्भात  तक्रारी केल्या होत्या, असे समितीने स्पष्ट केले.

१. शेक्सपिअरची आणखी एक कादंबरी ‘ज्युलियस सीझर’, तसेच ‘अरेबियन नाइट्स’ आणि फ्रेंच कादंबरीकार मॉलेरच्या कादंबरीच्या पहिल्या पानावर तशा प्रकारची चेतावणी प्रकाशित करण्यात आली आहे. जेन ऑस्टेन यांच्या ‘प्राइड-प्रिज्युडाइस’ या कादंबरीला मात्र बंदीच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ‘या कादंबरीचा विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होणार नाही’, असे मानले जाते.

बंदी घालण्याचा निर्णय मुर्खपणाचा ! – काही नागरिकांचे मत

‘हा निर्णय केवळ मूर्खपणाचा आहे. बंदीमुळे जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यापैकी असलेल्या खजिन्यापासून विद्यार्थी वंचित राहतील. त्याचा परिणाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर होऊ शकतो’, असे मत काही नारिकांनी व्यक्त केले आहे.

संपादकीय भूमिका

गेली अनेक दशके महत्त्व मिळालेल्या अशा साहित्याचे खरे स्वरूप आता तरी समोर आले, हेही नसे थोडके !