‘साधना शिबिरा’त आलेल्या अडथळ्यांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

नुकतेच भारतभरातील साधकांसाठी ‘साधना शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरात धर्मप्रचारक संतांनी साधकांना मार्गदर्शन केले. साधकांची व्यष्टी साधना (ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल) प्रतिदिन योग्य व्हावी, तसेच व्यष्टी साधनेच्या पायावर त्यांनी समष्टी साधना (समाजाला अध्यात्म शिकवून सात्त्विक बनवणे) चांगल्या प्रकारे करावी, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये साधकांना मार्गदर्शन करणार्‍या धर्मप्रचारक संतांना वाईट शक्तींनी २२, २३ आणि २४ जून या दिवशी त्रास देऊन त्यांच्या मार्गदर्शनाच्या सेवेमध्ये कसे अडथळे आणले ? याविषयीचा लेख २७.६.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आज ‘शिबिरात २७ जून या दिवशी वाईट शक्तींनी कशी आक्रमणे केली ?’, याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

२७.६.२०२२

१. शिबिरातील ३ धर्मप्रचारक संतांची प्राणशक्ती अल्प होणे, हा एकाच प्रकारचा त्रास बघून ‘शिबिरातील अन्य ९ संतांनाही तो त्रास अल्प-अधिक प्रमाणात होत असणार’, हे लक्षात घेऊन विश्वातील प्राणशक्ती आणि चैतन्य यांना ‘तुमच्या प्रवाहाने सर्व संतांची कुंडलिनीचक्रे भारित होऊ देत’, अशी प्रार्थना करणे अन् या उपायांचा लाभ झाल्याचे संतांनी सांगणे

‘शिबिराला सकाळी १०.३० वाजता आरंभ होणार होता. सकाळी १० वाजता मला शिबिरात मार्गदर्शन करणारे ३ धर्मप्रचारक संत यांचा एका पाठोपाठ एक भ्रमणभाष आला, ‘मला पुष्कळ थकवा आला असून मी पलंगावर आडवा पडून आहे. माझ्यात खोलीतून शिबिर स्थळी जाण्याचीही शक्ती नाही. तुम्ही माझ्यासाठी उपाय कराल का ?’ मी त्यांना ‘हो’ म्हटले. माझ्या मनात विचार आला, ‘ज्या अर्थी ३ संतांनी स्वतःची प्राणशक्ती अल्प असल्याचे सांगितले, त्या अर्थी शिबिरात सहभागी झालेल्या अन्य ९ संतांनाही हा त्रास अल्प-अधिक प्रमाणात होत असणार; म्हणून सर्वच संतांसाठी सामूहिक उपाय करूया.’

मी विश्वातील प्राणशक्ती आणि चैतन्य यांना प्रार्थना केली, ‘तुम्ही शिबिरातील सर्व संतांच्या मस्तकावर प्रवाहित व्हा. संतांचे सर्वांग चैतन्य आणि प्राणशक्ती यांनी पूर्णपणे भारित होऊ दे. त्यानंतर तुमचा प्रवाह संतांच्या ब्रह्मरंध्रातून त्यांच्या शरिरात प्रवाहित होऊन त्यांची सहस्रार ते मूलाधार ही सर्व चक्रे तुम्ही एक एक करून पूर्णपणे भारित करा.’ ही प्रार्थना केल्यावर मी संतांच्या प्रत्येक चक्रावर क्रमाने लक्ष केंद्रित केले आणि ‘त्यांची सहस्रार ते मूलाधार ही सर्व चक्रे चैतन्य आणि प्राणशक्ती यांनी भारित होत आहेत’, याची अनुभूती घेतली. त्यानंतर मी विश्वातील चैतन्य आणि प्राणशक्ती यांना प्रार्थना केली, ‘आता तुमच्या प्रवाहाने सर्व संतांच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण करू दे.’ हे होत असल्याचीही मी अनुभूती घेतली. त्यानंतर मी विश्वातील चैतन्य आणि प्राणशक्ती यांना प्रार्थना केली, ‘आता तुम्ही सर्व संतांभोवतीचे वातावरणही भारित करा.’ याचीही अनुभूती घेतल्यावर मी विश्वातील चैतन्य आणि प्राणशक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रार्थना केली, ‘आता तुम्ही तुमच्या स्थानी परत जा.’

वरील सर्व प्रक्रिया व्हायला १५ मिनिटे लागली. त्यानंतर मी मला संपर्क केलेल्या तिन्ही संतांना ‘आता कसे वाटत आहे ?’, असे विचारले. तेव्हा सर्व संतांनी एकच सांगितले, ‘तुम्ही नामजपादी उपाय करू लागल्यावर ५ – ६ मिनिटांतच मला पुष्कळ उत्साही वाटू लागले. माझी प्राणशक्ती वाढली आणि मी माझे आवरून शिबिर स्थळी आलोसुद्धा !’ ज्या अर्थी तिघांनाही लाभ झाला, त्या अर्थी अन्य संतांनाही लाभ झालाच असणार ! उपायांचा एवढा चांगला लाभ झाल्याचे बघून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘देव आपल्यासाठी किती करतो !’, हे बघून माझे डोळे भावाश्रूंनी भरले.

२. एका मार्गदर्शक संतांचे पाय आणि पाठ पुष्कळ दुखत असणे, तसेच त्यांना स्वतःवर पाताळातून त्रासदायक शक्ती येत असल्याचे जाणवणे अन् पाताळातून येणारी त्रासदायक शक्ती तळहातांची मुद्रा करून थोपवल्यावर आणि त्यांच्यावर नामजपादी उपाय केल्यावर त्यांना चांगले वाटू लागणे

दुपारी एक मार्गदर्शक संत यांनी मला सांगितले, ‘‘माझे पाय आणि पाठ पुष्कळ दुखत आहे. ‘पाताळातून काळी (त्रासदायक) शक्ती येत आहे’, असे वाटते. तुम्ही माझ्यासाठी उपाय कराल का ?’’ मी त्यांना ‘हो’ म्हटले. मी ‘माझा देह हा त्यांचाच आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा त्यांच्या देहाची स्पंदने मला माझ्या देहावर जाणवू लागली. उपायांच्या प्रारंभी मी पाताळातून, म्हणजे भूमीतून त्या मार्गदर्शक संतांवर येणारी काळी शक्ती थांबवण्यासाठी माझा डावा तळहात भूमीच्या दिशेने ठेवून त्यावर माझा उजवा तळहात उपडा, म्हणजे आकाशाच्या दिशेने येईल असा ठेवला. हा उपाय ५ मिनिटे केल्यावर ‘भूमीतून येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह आता थांबला आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मी मार्गदर्शक संतांच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर करण्यासाठी दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्याला दोन बाजूंनी टेकवून ‘मनोर्‍याप्रमाणे (टॉवरप्रमाणे) मुद्रा’ केली आणि ती मुद्रा माझ्या कुंडलिनीचक्रांवरून ‘वरून खाली आणि खालून वर’ अशी ७ – ८ वेळा फिरवली. तेव्हा मी ‘निर्गुण’ हा जप केला. त्या मार्गदर्शक संतांवरचे त्रासदायक आवरण दूर करण्यासाठी मला ५ मिनिटे लागली. त्यानंतर मी त्यांच्यासाठी उपाय शोधले असता मला ‘एका हाताचा तळवा डोळ्यांसमोर आणि दुसर्‍या हाताचा तळवा मणिपूरचक्रावर ठेवणे अन् ‘निर्गुण’ हा नामजप करणे’, हा उपाय मिळाला. मी तो उपाय २० मिनिटे केल्यावर त्या मार्गदर्शक संतांचा त्रास पूर्णपणे दूर झाल्याचे मला जाणवले. मी त्यांना भ्रमणभाष करून विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘आता मला चांगले वाटत आहे.’’

३. धर्मप्रचारक संतांना शिबिरात मार्गदर्शन करता येऊ नये, यासाठी मार्गदर्शनाच्या काही मिनिटे आधी वाईट शक्तींनी त्यांच्यावर आक्रमण करणे

३ अ. एका धर्मप्रचारक संतांना शिबिरात मार्गदर्शन करायच्या १० मिनिटे आधी अस्वस्थ वाटू लागणे आणि त्यांच्यावर उपाय केल्यावर त्यांची अस्वस्थता दूर होऊन त्यांना मार्गदर्शन करता येणे : शिबिरात सायंकाळी ६.३० वाजता एका धर्मप्रचारक संतांना मार्गदर्शन करायचे होते. त्याच्या १० मिनिटे आधी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याविषयी मला एकाने कळवल्यावर मी लगेच त्या धर्मप्रचारक संतांसाठी उपाय करू लागलो. मी आज्ञाचक्रावर तळहात ठेवून अन् ‘महाशून्य’ हा नामजप करत त्यांच्यावर १० मिनिटे उपाय केले. यामुळे त्यांची अस्वस्थता दूर झाली आणि त्या मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपिठावर जाऊ शकल्या.

३ आ. दुसर्‍या एक धर्मप्रचारक संत यांना चक्कर येऊ लागल्याने त्या शिबिरात मार्गदर्शन करू न शकणे : दुसर्‍या एका धर्मप्रचारक संतांना शिबिरात मार्गदर्शन करायचे होते. तेव्हा ५ मिनिटे आधी त्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्या मार्गदर्शन करू शकल्या नाहीत. त्यांचा रक्तदाब मोजला असता तो सर्वसाधारण होता. मी त्यांच्या आज्ञाचक्रावर उपाय केल्यावर त्यांना काही प्रमाणात बरे वाटले.

४. आक्रमण करणार्‍या वाईट शक्तींची रणनीती – वाईट शक्ती डावपेचात हुशार !

नुकतेच (१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत) ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनामध्ये वाईट शक्तींनी अधिवेशनात भाषणे करणार्‍यांवर फारशी आक्रमणे केली नाहीत. त्यांचा अधिकाधिक जोर अधिवेशनाचा ‘इंटरनेट’द्वारे होणारा प्रसार रोखण्यावर होता. याचा अर्थ वाईट शक्तींना या अधिवेशनाद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा भारतभर, तसेच जगभर होणारा प्रसार रोखायचा होता !

‘साधना शिबिर’ हे साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी होते. यामध्ये ‘साधकांनी स्वतःची, तसेच समाजाची उन्नती होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?’, याचे मार्गदर्शन करणार्‍या धर्मप्रचारक संतांवर वाईट शक्तींनी आक्रमण केले. वाईट शक्तींचा ‘धर्मप्रचारक संतांनी मार्गदर्शन करू नये’, हा डाव होता !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.६.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.